“… ८ जागा निवडून आणून दाखवा”; छगन भुजबळांचे जरांगेंना ओपन चॅलेंज

Chhagan Bhujbal On Manoj Jarange | राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र ओबीसी नेत्यांनी या मागणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसीच्या नेत्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना आगामी विधानसभेच्या दृष्टीने मोठे आव्हान दिले आहे.
‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करणार’, असा इशारा अनेकदा मनोज जरांगे यांनी दिला. आता यावरून “२८८ उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि ८ जागा निवडून आणून दाखवा”, असे आव्हान छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं. छगन भुजबळ सांगलीत ओबीसी मेळाव्यात बोलत होते.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? Chhagan Bhujbal On Manoj Jarange |
“राज्यात महायुतीच सरकार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मनोज जरांगेंना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापी आरक्षण मिळणार नाही. जरांगेंना आरक्षण समजते का? हजारो वर्षे दबलेल्या घटकाला पुढे नेण्यासाठी आरक्षण दिले गेले. त्यांनी अभ्यास करावा. तुम्हाला आरक्षण पाहिजे, कायद्याने जे काही असेल ते घ्या. आम्ही वेगळे काही मागितले नाही. सर्वांनीच कुणबी व्हायचं आहे, तर महाराष्ट्र मध्ये मराठा राहणार का नाही?” असेही भूजबळ म्हणाले.
“मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. अरे आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा”, असं आव्हान भुजबळ यांनी जरांगे यांना दिले. Chhagan Bhujbal On Manoj Jarange |
“सगळेच मराठे वाईट नाहीत. काही तटस्थ आहेत, काही आपल्या बाजूने बोलत आहेत, मात्र जो ओबीसींच्या आडवा जाईल, त्याला सोडू नका,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा :
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांचा सहा दिवसांनी खळबळजनक दावा ; अमेरिकेवर केले ‘हे’ गंभीर आरोप





