India-Nepal border : भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक; नेपाळ हिंसाचारानंतर प्रशासनाचा निर्णय
नेपाळच्या कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन धार्मिक समुदायांच्या उत्सवादरम्यान लाउडस्पीकरच्या वापरावरून तीव्र वाद निर्माण झाला.

India-Nepal border – शेजारील देश नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराचे पडसाद उमटल्यानंतर, सुरक्षेचा उपाय म्हणून बिहारमधील मधुबनी जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नेपाळच्या कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन धार्मिक समुदायांच्या उत्सवादरम्यान लाउडस्पीकरच्या वापरावरून तीव्र वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान जातीय हिंसाचारात झाले.
हिंसाचार आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती चिघळल्याने नेपाळ प्रशासनाने विविध भागांत संचारबंदी (कर्फ्यू) आणि प्रतिबंधात्मक हुकूम जारी केले आहेत.
भारताच्या सीमेला लागून असलेल्या मधेस प्रांतातील सप्तरी जिल्ह्यात शुक्रवारी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात कोणतीही अनचित घटना घडू नये आणि शांतता कायम राहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने सीमेवर पाळत वाढवली आहे.
सीमेवरील सर्व प्रमुख आणि पर्यायी मार्गांवर वाहनांची कडक तपासणी व शोधमोहीम सुरू. सीमाभागातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अतिरिक्त पोलीस दल तैनात केले आहे. संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे.
बिहार पोलिसांनी सीमाभागातील नागरिकांना प्रशासकीय सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, परिसरात कोणतीही संशयित व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.





