जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

jammu kashmir । आज जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या चकमकीत सतर्क सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. त्यांना जागीच ठार केले. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरी भागासह दोन ठिकाणी ही चकमक सुरू आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मीडियाला सांगितले की, पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी असून चकमक सुरू आहे. चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, किश्तवाडमध्येही दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये जेसीओसह दोन जवान शहीद झाले आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरी येथे शुक्रवारी रात्री उशिरा घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सर्च पार्टीवर गोळीबार केल्यानंतर या कारवाईचे चकमकीत रूपांतर झाले, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. रात्रभर घेराबंदी करण्यात आली. सकाळी झालेल्या गोळीबारात दहशतवादी मारला गेल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी आणि त्याच्या गटाची ओळख पटवली जात आहे. असेही त्यांनी सांगितले.





