पवनानगर – सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मावळ तालुक्यातील पवनमावळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व वन विभागाकडून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून धिंगाणा घालणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे व हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर यंदा शून्य सहनशीलता धोरण राबवले जाणार आहे. पवना धरण, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा किल्ले तसेच एकविरा देवस्थान, लायन्स पॉईंट व निसर्गरम्य तलाव पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. परिसरातील हॉटेल्स, टेंट व फार्महाऊस पूर्णतः भरले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके कार्यरत आहेत. मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, विना परवाना वाहनचालकांवर थेट कारवाई सुरू आहे. धरण परिसरातील मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर चाप बसावा म्हणून फिरती गस्त वाढवण्यात आली आहे. रात्री १० नंतर साऊंड सिस्टीमवर कडक बंदी असून नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांवर बदल करण्यात येऊन जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही पर्यटकांनी जबाबदारीने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन केले आहे. वणवा टाळण्यासाठी विशेष खबरदारी डोंगराळ भागात शेकोटी पेटवून न विझवता निघून जाण्यामुळे वणव्याचा धोका वाढतो. यामुळे वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाकडून ठिकठिकाणी गस्त वाढवण्यात आली असून पर्यटकांना सतर्क करण्यात येत आहे. वनरक्षक, वन्यजीव रक्षक संघटना आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम संयुक्तपणे कार्यरत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळ्याचा लायन्स पॉईंट दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय आवाहन गड-किल्ल्यांच्या परिसरात हुल्लडबाजी टाळा. सार्वजनिक ठिकाणी व धरण परिसरात मद्यपान करू नका. अरुंद रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतूक अडवू नका. शेकोटी पेटवल्यानंतर ती पूर्णपणे विझल्याची खात्री करा. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा.