सुरक्षेचा ऍन्टिव्हायरस आवश्यकच !

स्वाइन फ्यूची दहशत: आता करोना विषाणूची भीती,काळजी घेण्याचे आवाहन
पुणे – राज्यासह भारतात “करोना’ विषाणू शिरकाव करू नये, त्याला वेळीच रोखण्यासाठी सर्वप्रकारे दक्षता घेतली जात आहे. एवढेच नव्हे, तर अन्य देश किंवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच आरोग्य तपासणी केली जात असून, मुंबई आणि पुण्यात या आजारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. पुणे शहरात नायडू रूग्णालयामध्ये “करोना’साठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.
चीनसह जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतही “करोना’ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची मुंबईसह देशातील सात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कसून तपासणी केली जात आहे. दि. 23 जानेवारीपर्यंत मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी तीन प्रवाशांचा समावेश होता. मुंबईतील दोन प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्याने खबरदारी म्हणून त्यांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी “एनआयव्ही’ येथे पाठवण्यात आले आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये “करोना’ संशयितांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे सध्या चार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांची टीम सज्ज आहे. संशयित आढळून आल्यास या कक्षामध्ये उपचार केले जातील.
दरम्यान, जे प्रवासी “करोना’बाधित देशांतून येत आहेत, त्यांची माहिती दैनंदिन स्वरुपामध्ये विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागाला कळवली जात आहे. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशांतून आलेल्या तारखेपासून पुढील 28 दिवस दररोज पाठपुरावाही केला जात आहे. काही लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. तसेच त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“करोना’बाधित देशांतून मुंबईत आलेल्या एकूण सहापैकी दोघांना ताप होता. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, संशयितांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहेत. पण, सध्या कस्तुरबा रुग्णालयावर अधिक भर दिला जाणार आहे. गरज भासल्यास नायडू रुग्णालयातही उपचार केले जातील.
डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग
पुणेकरांनो, “करोना’पासून बाळगा सावधगिरी
प्रतिबंधकात्मक खबरदारी
“करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तींशी निकट सहवास टाळणे. हातांची नियमित स्वच्छता, न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत. खोकताना, शिंकताना नाका तोंडावर रूमाल किंवा टिश्यू पेपर वापरावा. वापरलेले टिश्यूपेपर त्वरीत झाकणबंद कचरा पेटीत टाकावे.
“करोना’ व्हायरस म्हणजे काय?
साध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स यासारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटाला “करोना’ म्हणतात. हा नवा विषाणू “एनसीओवी’ (novel corona virus 2019 (ncov) असल्याचे सिद्ध झाले आहे. सन 2003मध्ये आढळलेला (सार्स) हा देखील एक प्रकारचा “करोना’च होता.
करोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे
* सर्दी, खोकला (कॉमन कोल्ड)
* गंभीर स्वरुपाची श्वसन संस्थेची लक्षणे
* श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासास अडथळा
* न्यूमोनिआ, पचनसंस्थेची लक्षणे; अतिसार
* काही रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे
* प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्यांना लक्षणे आढळू शकतात.
“करोना’ पसरतो तरी कसा?
सध्या चीनमध्ये हुबेई प्रांतातील कहान शहरात या विषाणूचा प्रादूर्भाव पसरलेला आहे. दरम्यान, या विषाणूची जनुकीय रचना पूर्णपणे नवीन असल्याने त्याला नॉव्हेल करोना विषाणू असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, या विषाणूचा प्रादूर्भाव आपल्या राज्यात होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या विषाणूचा प्रसार कशाप्रकारे होतो याची निश्चित माहिती सध्या तरी माहिती नाही. तसेच त्यासाठी कोणतीही लस अथवा औषध उपलब्ध नाही. करोना विषाणू प्राणीजन्य आजार असला, तरी नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्याच्या संपर्कातून पसरतो याबद्दल निश्चित माहिती नाही. मात्र, लक्षणांचे स्वरूप पाहता शिंकणे, खोकणे यावेळी हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होत असावा, असा अंदाज आहे.




