Nasarapur : दुसऱ्यांदा भूमिपूजन! बनेश्वर रस्त्यावरून अजित पवार गट विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात ‘श्रेयानं’ राजकारण पेटलं…

नसरापूर : भोर तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आज पुन्हा एकदा भूमिपूजन करण्यात आले. तेही वेगळ्या राजकीय गटाकडून. यावेळी भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते पार पडले. विशेष म्हणजे, याच रस्त्याचे भूमिपूजन 7 जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यामुळे सध्या भोर परिसरात “काम महत्त्वाचं की श्रेय?” असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
रस्त्याच्या कामावरून वादाचं राजकारण
गेल्या काही महिन्यांपासून खासदार सुप्रिया सुळे आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिर रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुळे यांनी उपोषणही केले. त्यानंतर या रस्त्यासाठी PMRDA कडून 2 कोटी 41 लाख रुपये निधी मंजूर झाला. यानंतर त्यांनी 7 जून रोजी भूमिपूजन झाले. मात्र, आज आमदार शंकर मांडेकर यांनी पुन्हा याच रस्त्याचे भूमिपूजन करत सांगितलं, “वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरच आम्ही अधिकृत भूमिपूजन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, मंजुरीनंतर आमदार भूमिपूजन करतील.” त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी सुळे यांच्या भूमिपूजनाला अमान्य ठरवलं, हे उघड होत आहे.
स्थानिक प्रश्नांवर आमदार मांडेकरांची ठाम भूमिका
भूमिपूजनानंतर संवाद साधताना आमदार मांडेकर यांच्याकडे स्थानिकांनी विविध समस्या मांडल्या, त्यात महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
नसरापूर-केळवडे-माळेगाव शिवरस्ता प्रश्न
हा रस्ता शिवगंगा नदीवरून माळेगावकडे जोडण्याचा प्रस्ताव बराच काळ प्रलंबित आहे. अतुल चाळेकर यांच्यासह काही ग्रामस्थांनी याबाबत तोंडी निवेदन देत रुंदीकरण, अतिक्रमण हटाव आणि शिवगंगा पूलाचं ऑडिट करण्याची मागणी केली. यावर आमदार म्हणाले, “शिवगंगा पूल जुनाट झाला आहे. लवकरच त्याचं ऑडिट करून नव्याने पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करू.”
चेलाडी-नसरापूर रस्त्यावरील अतिक्रमण
या रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमणं वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. बाजारपेठेकडे येणाऱ्या लोकांना रोज त्रास सहन करावा लागतो. स्थानिक नागरिक अतुल चाळेकर यांनी निवेदन देत अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करण्याची मागणी केली.
पुणे-सातारा महामार्गाचं रखडलेलं काम
या महामार्गाच्या काही भागांवर अजूनही काम अपूर्ण आहे. यावर मांडेकर म्हणाले,
“रिलायन्स कंपनीसोबत लवकरच बैठक घेऊन उर्वरित कामांचा मार्ग काढू.”
वनविहार सोसायटी रस्त्यासाठी निधीची मागणी
नसरापूर येथील वनविहार सोसायटीत सुमारे 700 मीटरचा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात हा रस्ता चिखलयुक्त होतो. त्यामुळे 25 लाख रुपये निधीची मागणी गौण खनिज योजनेतून करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला जाणार आहे.
बनेश्वर मंदिर रस्ता लवकरच पूर्णत्वास
बनेश्वर देवस्थानाच्या कमानीपासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वनविभागाच्या हद्दीत येतो. तो रस्ता लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन आमदार मांडेकर यांनी दिलं.
विकासकामं की राजकारण?
एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन होणं म्हणजे श्रेयवादाचं राजकारण चव्हाट्यावर आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतरही अजित पवार गटाने नव्याने भूमिपूजन करून ‘प्रतिष्ठेची लढाई’ सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो आहे.





