शेअर मार्केटमधील आणखी एक मोठा घोटाळा उघड, केतन पारेखचे नाव आले समोर, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Know What is Front-Running Scam: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका फ्रंट-रनिंग घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या घोटाळ्यामध्ये आतापर्यंत केतन पारेख, सिंगापूर स्थित उद्योजक रोहित साळगावकर आणि अन्य काही लोकांची नावे समोर आली आहेत. केतन पारेख आणि रोहित साळगावकर याआधी देखील एका घोटाळ्यात जेलमध्ये गेला होता. त्यानंतर या दोघांवर मार्केटमध्ये व्यवहार करण्यावर 14 वर्षांपर्यंत बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एका घोटाळ्यात दोघांचे नाव समोर आले आहे.
सेबीने या घोटाळ्याची माहिती देताना सांगितले की, पारेख आणि साळगावकरने फ्रंट-रनिंगची योजना आखली होती. यामध्ये जवळपास 65.77 कोटी रुपयांची बेकायदेशीररित्या जमा केलेला नफा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. केतन पारेख आणि अशोक कुमार पोद्दारवर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
फ्रंट रनिंग म्हणजे काय?
फ्रंट रनिंग ही एकप्रकारे बेकायदेशीर पद्धत आहे, ज्यात ब्रोकर अथवा ट्रेडर स्वतःच्या फायद्यासाठी क्लाइंट ऑर्डरच्याबाबतीत गोपनीय माहिती मिळवतो. फ्रंट रनिंगला मार्केटमधील हेरफेर आणि इनसाइडर ट्रेडिंगचा प्रकार मानला जातो.
समजा, X हा एक रिटेल गुंतवणुकदार आहे, जो XYZ कंपनीचे 1 हजार शेअर्स खरेदी करण्यासाठी ब्रोकरेज फर्मशी संपर्क करतो. ब्रोकरेज फर्म दुसरा ट्रेडर Y ला याची माहिती देते. X कडून ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर Y ला ही ऑर्डर महत्त्वाची वाटल्यानंतर कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढवली जाऊ शकते. यामुळे X ची ऑर्डर लागू करण्याऐवजी कंपनीचे स्टॉक्स खरेदी करण्यासाठी Y ची ऑर्डर आधी लागू केली जाते.
Y च्या ऑर्डरमुळे शेअरची मागणी वाढते व यामुळे शेअर्सच्या किंमतीत देखील वाढ होते. अशावेळी Y वाढलेल्या किंमतीत शेअर्सची विक्री करून नफा कमवतो. Y ला नफा झाल्यानंतरच X ची ऑर्डर लागू केली जाते. याच प्रक्रियेला फ्रंट रनिंग घोटाळा म्हटले जाते.
केतन पारेखने कसा केला घोटाळा?
SEBI ने माहिती दिली की, एका फंड हाऊसचे साळगावकरशी जवळचे संबंध होते. हा फंड हाऊस कोणताही व्यवहार करण्याआधी साळगावकरला याबाबत माहिती देत असे व साळगावकर ही माहिती केतन पारेखपर्यंत पोहोचवत असे. अशाप्रकारे, आधीच माहिती प्राप्त झाल्याने केतन पारेख वेगवेगळ्या अकाउंटवरून ट्रेड पूर्ण करून नफा कमवत असे.
दरम्यान, केतन पारेखचे नाव याआधी देखील शेअर मार्केटमधील घोटाळ्यात आले आहे. कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याने स्वतःचे एक वेगळे नेटवर्क तयार केले होते. घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्याच्यावर मार्केटमध्ये व्यवहार करण्यावर बंदी देखील घालण्यात आली होती.




