Maharashtra CM – विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळाले असून महाविकास आघाडी भुईसपाट झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात वजन टाकल्याने विधानसभेत त्यांचेच पारडे जड राहील असे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र विधानसभेत राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलल्याचे निकालांमधून पाहायला मिळाले. पराभवानंतर महाविकास आघाडी’कडून EVM वर शंका उपस्थित करण्यात येत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याचा फैसला होऊ शकलेला नाही. आज महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. दिल्ली येथे अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत अमित शहा पुढील मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा मागे घेतला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आधीच पसंती दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. असं असलं तरी भाजप नेतृत्व हे अनपेक्षित निर्णयांसाठी सुपरिचित असल्याने राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची धाकधूक नाव जाहीर होईपर्यंत कायम राहणार आहे. यापूर्वी भाजप नेतृत्वाने मध्यप्रदेश, गुजरात, आसाम येथे असाच धक्का देणारा निर्णय घेत सर्वांना चकित केले होते. | Maharashtra CM