विज्ञानविश्‍व : इग नोबेल

मेघश्री दळवी

नोबेल पारितोषिक हा विज्ञानक्षेत्रातला सर्वोच्च मान आहे. मानवजातीला बहुमूल्य ठरणाऱ्या संशोधनाचा उचित गौरव व्हावा ही त्यामागची कल्पना. पण कधी कधी संशोधक दुसऱ्याच टोकाला जाऊन काहीतरी अतरंगी विषयाचा अभ्यास करताना दिसतात. असे प्रकल्प हुडकून काढून त्यांना प्रदान केलं जातं “इग नोबेल’ पारितोषिक!

“इग्नोबल’ या इंग्लिश शब्दाचा अर्थ आहे अतिशय सामान्य, अजिबात महत्त्वाचं नसलेलं. म्हणूनच आपल्या ज्ञानात काहीच मोलाची भर न घालणाऱ्या संशोधनाला दर वर्षी सप्टेंबरमध्ये एका खास कार्यक्रमात इग नोबेल पारितोषिक देण्यात येतं.

गेलं वर्ष जवळजवळ करोनाच्या सावटामध्ये गेलं. पण मागच्या वर्षीची इग नोबेल पारितोषिकं पाहिली तर काही शास्त्रज्ञ त्याही काळात बिन महत्त्वाचं संशोधन करत होते, हे बघून खरोखरच आश्‍चर्य वाटेल! या साथीत लसींवर वेगाने संशोधन होत असताना एक चमू मात्र मिसोफोनिया या वैद्यकीय समस्येवर काम करत होता. दुसऱ्यांनी चघळताना केलेले आवाज ऐकून होणारा मनस्ताप म्हणजे मिसोफोनिया. साहजिकच त्यांनी वैद्यकशास्त्रातलं इग नोबेल पटकावलं आहे!

एंटोमोलॉजीमध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. असा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना कोळ्यांची भीती कितपत वाटते याविषयीचे पुरावे गोळा करणाऱ्या रिचर्ड वेटर या शास्त्रज्ञाला खास इग नोबेल परितोषिक मिळाले आहे. कीटकांना सहा पाय असतात तर कोळ्यांच्या गटात आठ पाय असतात. दोन पाय जास्त असल्याने भीती वाटते का, हा रिचर्ड वेटरच्या संशोधनाचा विषय!

दुसरीकडे मानसशास्त्र विभागात नार्सिसिस्ट म्हणजे स्वत:वर भयंकर खूश असणारे लोक त्यांच्या भुवयांवरून ओळखण्यासाठी दोन शास्त्रज्ञांना इग नोबेल मिळालं आहे. या संशोधनासाठी चक्‍क कॅनडाच्या सरकारने फंडिंग दिलेलं आहे!

ऍकॉस्टीक्‍स हा तसा गंभीर विषय. न्यूटनने या ध्वनीविज्ञानाचा पाया घातला आणि त्यात अनेक संशोधकांनी मोलाची भर घातली आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ध्वनीतरंगांचा प्रवास आणि परिणाम कसा होतो यावर ऍकॉस्टीक्‍समध्ये संशोधन होत असतं. त्यात अल्ट्रासाऊंड आणि इन्फ्रासाऊंड तरंगांचाही अभ्यास होतो. पण हेलियम वायूने भरलेल्या बंदिस्त खोलीत सुसरीने काढलेल्या आवाजाच्या वारंवारतेचा अभ्यास कधी ऐकलाय का? गेल्या वर्षीचा ऍकॉस्टीक्‍सचा इग नोबेल पुरस्कार मिळालेल्या चमूने नेमका हाच अभ्यास केलेला आहे!

अशा अभ्यासाचं फलित काय? त्याचा कुठे काही वापर होऊ शकतो का? असे प्रश्‍न साहजिकच मनात उभे राहतात. मात्र अनेकदा आज विचित्र वाटणारं संशोधन उद्या उपयोगी पडू शकतं. कच्ची स्पॅगेटी वाकवली तर तिचे दोनपेक्षा जास्त तुकडे होतात अशा निष्कर्षासाठी एका फ्रेंच संशोधक चमूला 2006 मध्ये भौतिकशास्त्रातलं इग नोबेल मिळालं होतं.

तेव्हा हास्यास्पद वाटणाऱ्या या संशोधनाचा पुढे पुलाच्या बांधकामात भेगा कशा पडू शकतात याचा अंदाज बांधण्यासाठी खराखुरा वापर झाला. तेव्हा शास्त्रीय संशोधनात काहीच टाकाऊ नसतं याचा प्रत्यय आला. हीच इग नोबेल पारितोषिकाची गंमत!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.