मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक सापडल्याने शास्त्रज्ञ हैराण

ॲमस्टरडॅम: जगात सर्वत्रच प्रदूषणाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याचा मोठा फटका मानवजातीला बसत आहे. आता मानवी रक्तामध्ये प्रथमच मायक्रो प्लास्टिकचे कण आढळल्याने वैज्ञानिक हैराण झाले आहेत. या नवीन संशोधनाप्रमाणे 80 टक्के लोकांच्या रक्तामध्ये अशा प्रकारचे मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले असून मायक्रोप्लास्टिक हे मानवी शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचेही आढळले आहे.
या गोष्टीचा मानवी आरोग्यावर किती परिणाम होणार आहे. याबाबत अजून शास्त्रज्ञांनी माहिती घेतलेली नसली तरी ही घटना निश्चितच धक्कादायक आणि भीतीदायक असल्याचे शास्त्रज्ञ मानत आहेत. प्रदूषणाच्या माध्यमातून अनेक कण मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याचा मोठा फटका मानवाला बसतो.
दर वर्षी अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे हजारो लोकांचा जीव जात असल्याने या नवीन संशोधनामुळे काय परिणाम होणार याबाबत शास्त्रज्ञ चिंतीत आहेत. पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा जमा झालेला असतो त्यापैकी मायक्रोप्लास्टिकचे कणही पर्यावरणात सर्वत्र सापडत असतात. खाण्यापिण्याच्या सवयी आणि श्वासोच्छवासाचा माध्यमातून ही पार्टिकल्स मानवी शरीरात पोहोचतात. ज्या लोकांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या होत्या त्यापैकी 17 लोकांच्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले.
शितपेयाच्या किंवा इतर पेयांच्या प्लास्टिक बाटल्या किंवा अन्नपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू यांचे काही कणही या लोकांच्या रक्तामध्ये सापडले. सामान्य नागरिक ज्या पिशव्यांचा राजरोस वापर करतात, त्या पॉलिथिन बॅगचे कणही रक्तामध्ये आढळले.





