विज्ञानविश्व: या बर्फाखाली दडलंय काय?

आर्क्टिक प्रदेशातील बर्फ आता वेगाने वितळत आहे. त्याचा परिणाम म्हणून समुद्राची पातळी वाढत आहे. त्याच वेळी या बर्फाखाली दडलेल्या एकएक गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आर्क्टिक बर्फाच्या थरांखाली रहाणारे जीवाणू आणि विषाणू. देवीचे विषाणू आणि ऍन्थ्रॅक्स फैलावणारे जीवाणू या थरांखाली आहेत हे निश्चित. त्यापलीकडे आणखी कितीतरी धोकादायक सूक्ष्मजीव तिथे असण्याची शक्यता आहे.
याच बर्फाच्या थरांखाली भरपूर मिथेन वायू वर्षानुवर्षे साठून राहिलेला आहे. वितळणाऱ्या थरांमधून हा वायू मुक्त झाला तर पहिल्यांदा समुद्रातलं आणि मग वातावरणातलं त्याचं प्रमाण वेगाने वाढेल. पृथ्वीचं तापमान वाढवणाऱ्या ग्रीनहाउस वायूंमध्ये मिथेनचा मोठा सहभाग आहे. तेव्हा तापमानवाढ आणखी झपाट्याने होऊ शकते.
दुसरीकडे तिबेट पठारावर असलेल्या हिमनद्यांमध्ये शास्त्रज्ञांना सुमारे नऊशे प्रकारचे सूक्ष्मजीव मिळाले आहेत. इतक्या उंचीवर हिमनद्यांवर सतत बर्फाचे नवनवे थर चढत राहतात. त्यामुळे त्यात काही जीव अडकले तर ते तसेच थिजून राहतात. हिमनद्यांमध्ये मिळालेले सूक्ष्मजीव गेली निदान एक हजार वर्षे असे बर्फाखाली आहेत. म्हणजे आधुनिक माणसाच्या गेल्या कित्येक पिढ्यांचा या जीवांशी संबंध आलेला नाही. हे जीव आज पृथ्वीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत. ते आपल्याला पूर्णपणे नवीन असल्याने त्यांचा आपल्याला काही धोका असू शकेल का?
जोवर हे सूक्ष्मजीव हिमनद्यांमध्ये अडकून आहेत, तोवर त्यांचा माणसांशी थेट संबंध येणार नाही. पण उद्या हिमनद्या वितळल्या की हे जीव जगाच्या पाठीवर झपाट्याने पसरू शकतील. करोना महासाथीचा आपला अनुभव इतका हादरवून टाकणारा आहे, की अशा सूक्ष्मजीवांमुळे एखादी नवी महासाथ उद्भवू शकेल का ही भीती आहे.
तिसरा धोका आहे तो बर्फाखाली आणखी काही घातक गोष्टी असतील त्याचा. त्यात मुख्य आहे आण्विक कचरा. सोबत पारा, आर्सेंनिक, डीडीटी यांचे काही अंश तिथे असल्याचा पुरावा वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये मिळालेला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात तिथे काही गुप्त प्रयोग झाले आणि त्याचे अवशेष बर्फाखाली राहिले, असा संशोधकांचा अंदाज आहे.
यावर उपाय काय? निरनिराळ्या तज्ज्ञांच्या मते ठोस उपाय आपल्याकडे नाही. पण बर्फ वितळण्याआधी आपण अभ्यास करून या धोक्यांसाठी काही करू शकतो.
चिनी शास्त्रज्ञांनी तिबेटमधल्या सूक्ष्मजीवांचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं आहे. त्यांना नष्ट करण्यासाठी काय करता येईल हा विचार सुरू आहे. मिथेन पुन्हा बर्फाखाली किंवा निदान समुद्राखाली खोलवर दडपून टाकण्यासाठी काही प्रयत्न करता येतील. वातावरणातले ग्रीनहाउस वायू कमी करण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. ते यशस्वी झाले तर मिथेनचा प्रश्न अंशत: सोडवता येईल.
तोपर्यंत बर्फाखाली दडलेल्या आणखी कोणकोणत्या गोष्टी बाहेर येत राहतील, ते पाहूया.
डॉ. मेघश्री दळवी





