विज्ञानविश्व: अवघे साडेपाच ग्रॅम

अलीकडे ऍस्टरॉइड्सच्या म्हणजे अशनींच्या अभ्यासाला महत्त्व येत चाललं आहे. अवकाशात फिरणाऱ्या छोट्यामोठ्या खडकाळ अशनींमध्ये माहितीचा खजिना दडलेला असतो. त्यांच्यावर वातावरण नसल्याने तिथे खडकांची झीज होत नाही. ऑक्सिजन किंवा वातावरणातल्या इतर वायूंशी खडकातल्या घटकांचा संयोग होत नाही.
कोट्यवधी वर्षे आहेत त्याच स्थितीत हे खडक राहू शकतात. त्यामुळे अशनींच्या नमुन्यावरून विश्वाची निर्मिती कशी झाली, त्यात कोणते घटक होते आणि आता आहेत, अशी माहिती मिळवता येते. आपल्या सौरमालेचा जन्म कसा झाला, ती हळूहळू कशी विकसित होत गेली याचा अंदाज अशा नमुन्यांवरून लावता येतो. अवकाशात पाणी असेल का, कोणत्या स्वरूपात असेल, पाण्यामुळे कुठे सजीव असतील का, अशा प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती अशनींकडून मिळू शकतात.
म्हणूनच नासा आणि इतर अवकाश संशोधन संस्था अशनींच्या मोहिमांवर लक्ष देत आहेत. त्यातली एक गाजणारी मोहीम म्हणजे ऱ्यूगू या अशनीसाठीची हायाबुसा मोहीम. साधारण एक किमी लांबीच्या आणि आपल्यापासून सुमारे तीस कोटी किमी अंतरावर असलेल्या ऱ्यूगूकडे जपानचं हायाबुसा-2 यान डिसेंबर 2014 मध्ये झेपावलं. चारहून अधिक वर्षे प्रवास करून ते फेब्रुवारी 2019 मध्ये ऱ्यूगूवर उतरलं आणि त्याने ऱ्यूगूचे नमुने घेतले. हे सुमारे साडेपाच ग्रॅम वजनाचे नमुने दोन वर्षांच्या प्रवासानंतर डिसेंबर 2020 मध्ये पृथ्वीवर पोहोचले. या अवघ्या साडेपाच ग्रॅमनी आपल्याला विश्वातल्या कितीतरी प्रश्नांची उकल करण्यासाठी दिशा दिली आहे. त्यात ऱ्यूगूच्या अंतर्भागातले वायुरूप नमुने, पृष्ठभागावरील धुळीचे नमुने आणि ड्रिल करून घेतलेले खडकांचे नमुने आहेत. या साडेपाच ग्रॅमचेही नंतर छोटे वाटे करून वेगवेगळ्या संशोधक गटांकडे सोपवण्यात आले. त्यांच्या प्राथमिक अभ्यासावरून सूर्यमालेच्या इतिहासावर नवा प्रकाश पडतो आहे.
ऱ्यूगूचे खडक सच्छिद्र आहेत. त्यांच्या आकारातला जवळपास निम्मा भाग पोकळ आहे. उरलेल्या भागातल्या काळपट कणांमध्ये भरपूर कार्बन आहे. या कणांचा आकार आठ मिलिमीटरपासून एक मिलिमीटरपेक्षाही लहान इतका सूक्ष्म आहे. खडकांमध्ये कार्बोनेट्सच्या सोबतीने नायट्रोजन आणि हायड्रोजनची संयुगं आढळली आहेत. त्यात वीस प्रकारच्या अमिनो ऍसिड्सचे रेणू मिळाल्याने पृथ्वीवर सजीवसृष्टी कशी निर्माण झाली असेल याचा एक धागा मिळतो.
संशोधकांच्या मते, आजवर आपल्या हातात आलेला हा सौरमालेतलं सर्वात पुरातन पदार्थ आहे. त्याचं वय असेल अंदाजे दोन अब्ज वर्षे! या नमुन्यांमध्ये काही कण सौरमालेबाहेरून आलेले असण्याची शक्यता दिसत आहे. अशनी पृथ्वीवर पडतात तेव्हा वातावरणातल्या घर्षणामुळे त्यांच्यातल्या घटकांचं स्वरूप बदलतं. ऱ्यूगूचे नमुने मात्र अवकाशातून थेट पृथ्वीवर सुरक्षित आवरणातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पृथ्वीच्या वातावरणाचा कोणताही परिणाम झालेला नाही. जसे अवकाशात, तसेच ते आपल्या प्रयोगशाळेत पोहोचले आहेत. म्हणून या ऱ्यूगूच्या अवघ्या साडेपाच ग्रॅमचं महत्त्व!
डॉ. मेघश्री दळवी





