विज्ञानविश्व : लीप आणि ड्रॉप

जून 29, 2022 हा दिवस पृथ्वीच्या इतिहासातला सर्वात छोटा दिवस ठरला. पृथ्वी स्वत:भोवती फिरते त्या परिभ्रमणाचा काळ आपण एक दिवस म्हणजे चोवीस तास असं मानतो. या विशिष्ट दिवशी मात्र पृथ्वीने स्वत:भोवती फिरायला तब्बल 1.59 मिलिसेकंद कमी वेळ घेतला. आपल्याला वाटेल की इतक्या सूक्ष्म तफावतीने काय मोठा फरक पडणार आहे? पण फरक पडतो.
मुळात आपण दिवसाचा कालावधी निश्चित केला होता तो सूर्य डोक्यावर येण्याचा वेळांमधला सरासरी काळ. पण पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या गतीत अनियमित बदल होत असल्याने हे एकक व्यावहारिक नव्हतं. पुढे 1964 मध्ये एककांचं प्रमाणीकरण करताना आपण त्यासाठी ऍटॉमिक क्लॉकचा आधार घेतला. आंतरराष्ट्रीय एकक प्रणालीनुसार एक सेकंद म्हणजे सीझियम-133 अणूच्या विशिष्ट प्रारणाच्या 9,192,631,770 आंदोलनांना लागणारा काळ.
ऍटॉमिक घड्याळं तीनशे अब्ज वर्षांमध्ये केवळ एका सेकंदाने मागेपुढे होऊ शकतात. त्यामुळे कॉम्प्युटर, मोबाइलसारख्या विविध साधनांमध्ये आणि वेगवेगळ्या स्वयंचलित यंत्रणा, दूरसंचार नेटवर्क, इंटरनेट यात ऍटॉमिक घड्याळानुसार वेळ वापरतात. त्यात सतत सूक्ष्म फरक पडत गेला तर काही काळाने तो फरक मोठा होईल आणि या यंत्रणांची अचूकता धोक्यात येईल. म्हणून पृथ्वीचा प्रत्येक दिवस काटेकोरपणे मोजण्याचा प्रपंच.
गेल्या काही वर्षांमध्ये पृथ्वीचा परिभ्रमणाचा वेग किंचित वाढल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे दिवसात एखाद्या मिलीसेकंदाची घट होते आहे. याआधी 19 जुलै 2020 मध्ये दिवस 1.47 मिलीसेकंदांनी लहान झाला होता, तर यावर्षी 29 जून 2022 रोजी 1.59 मिलीसेकंदांनी. यामागे काय कारण असावं, यावर शास्त्रज्ञांचं एकमत नाही. काही जणांच्या मते, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या थरांमधल्या विविध घडामोडींमुळे असं होत असेल, तर काही संशोधकांच्या मते पृथ्वीच्या गाभ्यातल्या हालचालींचं हे फलित असेल. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाने तर हा परिणाम होत नाही ना, अशी शंका काही तज्ज्ञांना आहे, तर काही अभ्यासक मानतात की पृथ्वीचे चुंबकीय आणि भौगोलिक ध्रुव यांच्यात होणाऱ्या बदलांशी त्याचा संबंध असेल.
कारण काहीही असो, या छोट्या छोट्या फरकांनी पुढे आपल्यावर वर्षात एखादा सेकंद कमी करण्याची किंवा ड्रॉप करण्याची वेळ येईल. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ 365 दिवसांपेक्षा थोडा जास्त असल्याने आपण दर चार वर्षांनी एक जादा दिवस लीप दिवस म्हणून घेतो. त्याच धर्तीवर सौर वेळ आणि ऍटॉमिक वेळ यांच्यातला फरक जुळवून घेण्यासाठी लीप सेकंद वाढवण्याची गरज पडते. ही पद्धत 1972 पासून सुरू झाल्यावर आतापर्यंत 27 वेळा लीप सेकंदाची भर आपण ऍटॉमिक वेळेत घातली आहे. आता जर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवस किंचित घटत गेला, तर मात्र ऍटॉमिक वेळेतून एक सेकंद ड्रॉप करण्याची परिस्थिती येणार आहे.
डॉ. मेघश्री दळवी





