तेलंगणमध्येही आठवडाभर शाळा बंद

हैदराबाद – ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले जाऊ लागले आहेत. तेलंगणमध्येही आता 8 ते 16 जानेवारीदरम्यान शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली. राज्यातील सर्वच शिक्षण संस्थांना 8 ते 16 जानेवारीदरम्यान सुटी असेल, असे त्यांनी सांगितले. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बेड, औषधे, ऑक्सजन आणि चाचणीचे किट खरेदी केले जातील, असेही राव यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर “बस्ती दवाखाना’ सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. ओमायक्रॉनबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. उलट सावधगिरी बाळगावी आणि करोना अनुकूल वर्तन कायम ठेवावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
केंद्र सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार तेलंगणमध्ये सध्या लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही, असेही राव यांनी सांगितले.





