Maharashtra School : राज्यातील शाळा 25 तारखेला राहणार बंद !

Maharashtra School – आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना शासनाच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. शिक्षक संच मान्यतेचा 15 मार्च 2024 आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 सप्टेंबर 2024 असे दोन्ही निर्णय राज्य सरकारने रद्द करावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
मात्र या निर्णयाला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे शिक्षक संघटनेकडून या निर्णयाला विरोध केला जात आहे. तसेच नवीन धोरणानुसार 20 किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर फक्त एकच शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. येत्या 25 सप्टेंबरला सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.





