School Girl Harassment – शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. युुनूस गफार खान (५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी पीडित ११ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक खान याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून आवश्यक ते पुरावे संकलित करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांनी ही कारवाई केली.