Maharashtra Weather : वाढत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल! ‘या’ जिल्ह्याने घेतला निर्णय
Maharashtra Weather : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Weather : उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली असून मार्चच्या मध्यातच तापमाचा पारा वाढला आहे. काही ठिकाणी तर पारा 41 अंश सेल्सअवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर कोकणातील डहाणू, मुंबई आणि ठाणे येथे तीव्र उष्णतेच्या लाटेची नोंद झाली. त्यामुळे तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मुंबईत अनेक वर्षांनी उष्णतेचा पारा 40 अंशावर पोहोचला. एकीकडे कडक ऊन असताना दुसरीकडे राज्यातील काही भागांना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल केला जाणार आहे. हा बदल उद्या म्हणजेच सोमवारी, 16 मार्चपासून केला जाणार आहे. त्यानुसार जिल्हातील 3080 शाळा सकाळी 7 ते दुपारी साडेबारादरम्यान भरविण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा ४० अंशावर
जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांजवळ पोहोचला आहे. उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांचा वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलेला जिल्हा
मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये करण्यात आली आहे. 41 अंशावर जिल्ह्याचे तापमान गेले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.





