School Holidays : महाराष्ट्रातील ‘या’ शाळांना सलग 5 दिवस सुट्टी? महत्त्वाचं कारण समोर

मुंबई : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या तयारीमुळे आणि शिक्षकांवर लावण्यात आलेल्या निवडणूक ड्युटीमुळे काही भागांतील शाळांना सलग सुट्ट्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी राज्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळा या दिवशी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा ताब्यात घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मतमोजणीच्या दिवशीही सुट्टीची मागणी
दरम्यान, 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीही शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. मात्र या मागणीवर प्रशासनाने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही.
शिक्षकांवर निवडणूक ड्युटीचा ताण
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 14 आणि 15 जानेवारी रोजी निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतरही ईव्हीएम व कागदपत्रांच्या कामासाठी शिक्षकांना उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर थांबावे लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा घरी पोहोचलेल्या शिक्षकांना शुक्रवारी पुन्हा शाळेत वेळेत हजर राहणे कठीण जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे 16 जानेवारीलाही शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शाळांना सलग ५ दिवस सुट्ट्या
राज्यातील शाळांना उद्या म्हणजेच १४ जानेवारीपासून सुट्ट्या असणार आहे. शाळा आता थेट पुढच्या सोमवारी सुरु होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांत आहे. यानंतर १५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी आहे. यानिमित्त शाळांना सुट्ट्या असणार आहे. १५ आणि १६ जानेवारीला महापालिका निवडणुका झाल्यानंतर शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. यानंतर रविवारी शाळांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे उद्यापासून शाळांना ५ दिवस सलग सुट्टी असणार आहे.
15 जानेवारीला शाळांना सुट्टी
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्याने त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये, यासाठी 14 जानेवारी रोजी शाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी राहणार आहे. आता 16 जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर होते का, याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.



