पुणे | शाळकरी मुले व्यसनाच्या विळख्यात?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या काही महिन्यांपासून शहरातील तरुण मुले अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असतानाच; आता शालेय मुलेही व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे समोर येत आहे.
वारजे येथील पाॅप्युलरनगर येथील सोसायटीच्या परिसरात १० ते १४ वर्षांची मुले चक्क धूम्रपान करताना आढळून येत आहेत.
त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या गणवेशातील ही मुले असून, शाळा सुटल्यानंतर हे धूम्रपान करत थांबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तरुणांपाठोपाठ आता शाळकरी मुलांचे व्यसन ही चिंतेची बाब होत आहे.
कुठे घडला प्रकार?
एका खासगी शाळेजवळच हा प्रकार घडला असून, शालेय गणवेशातील मुले धूम्रपान करताना दिसून येत आहेत. ही मुले घोळक्याने एका इमारतीजवळ उभी असताना सोसायटीतील सदस्यांनी या मुलांच्या हालचाली टिपल्या.
त्यामध्ये एका मुलाने आपल्या खिशातून सिगारेट काढली आणि ती सराईतपणे पेटवली. त्याच्याच शेजारी असलेल्या आणखी एका युवकानेही तसाच प्रकार केला. त्यामुळे मोठ्या मुलांचाही या प्रकारास हातभार असून, पालकांना याची साधी कल्पनाही नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
पालिका, पोलिसांचे तोंडावर बोट
शाळांच्या परिसरात १०० मीटरच्या आवारात तंबाखूजन्य, तसेच अंमली पदार्थ विकण्यास मनाई आहे. मात्र, अनेक शाळांच्या आवारात सिगारेट, तंबाखू, तसेच गुटखा विक्रीच्या टपऱ्या असून, या ठिकाणी मुलांच्या वयाचा विचार न करताच थेट विक्री होत आहेत.
त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे उपनगरांमध्ये तर शाळांच्या आसपासच हुक्का पार्लर असून, सेनापती बापट रस्त्याच्या परिसरात शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या परिसरातील एका शाळेनजीक हुक्का विक्रीचे दुकान थाटले आहे.
या दुकानांवर महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित असताना या विक्रेत्यांकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
नियमित संवादाची गरज
शहरात लहान कुटुंबात आई- वडील नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असल्याने मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो. अशा वेळी आपली मुले शाळा सुटल्यानंतर कुठे जातात, काय करतात, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
याशिवाय पालकांनी मुलांशी नियमितपणे संवाद साधल्यास मुलांच्या वर्तणुकीतील बदल लक्षात येत असल्याने अशा वयोगटातील मुलांच्या पालकांनी वेळीच जागे होऊन मुलांशी चर्चा करणे गरजेचे आहे.





