SBI Data Leak : एसबीआय बॅंकेच्या ग्राहकांचा डेटा चोरीचा दावा; 3.75 लाख रेकॉर्ड लीक झाल्याची चर्चा
SBI Data Leak : SBIच्या 3.75 लाख रेकॉर्ड आणि 2,722 PDF कागदपत्रांची चोरी झाल्याचा हॅकर ग्रुपचा दावा. डेटा लीकची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

SBI Data Leak : भारतीय स्टेट बँक (SBI)च्या ग्राहकांचा डेटा चोरी झाल्याचा दावा एका अज्ञात हॅकर ग्रुपने केला आहे. ‘Siriusim’ नावाच्या या ग्रुपकडे SBIशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचे सांगण्यात आले आहे. यात ग्राहकांची वैयक्तिक माहिती, घरांचे पत्ते, कर्ज अर्ज आणि खाते उघडण्यासाठी वापरलेली कागदपत्रे असल्याचा दावा आहे. मात्र, या डेटा लीकची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
सायबर सुरक्षेवर लक्ष ठेवणाऱ्या CyberPulse56 या अकाउंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली. त्यानुसार, हॅकर ग्रुपकडे CSV स्वरूपातील सुमारे 3.75 लाख रेकॉर्ड आणि 2,722 PDF कागदपत्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
डेटा खरा असल्यास धोका काय?
SBIचा डेटा नेमका कुठून मिळाला, तो बँकेच्या यंत्रणेतूनच चोरी झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच 3.75 लाख रेकॉर्ड म्हणजे किती ग्राहकांची माहिती आहे, हेही निश्चित नाही.
CyberPulse56 ने 16 ऑक्टोबरला प्रथम या दाव्याची माहिती दिली होती. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, 20 ऑक्टोबरपर्यंत SBIने या प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले नव्हते.
कथित डेटा खरा ठरल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगारांकडून ओळख चोरी, आर्थिक फसवणूक, बनावट कर्ज अर्ज किंवा फिशिंगद्वारे बँकिंग माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
20 वित्तीय संस्थांवर सायबर हल्ले
SBIशी संबंधित हा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा भारतीय वित्तीय संस्थांवर सायबर हल्ल्यांच्या घटना वाढल्याचे वृत्त आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ने 15 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये सुमारे 20 बँका, NBFC आणि फिनटेक कंपन्यांवर सायबर हल्ले झाले होते. चोरी झालेले लॉगिन तपशील आणि पेमेंट APIमधील त्रुटींचा वापर केल्याचे सांगण्यात आले.
CERT-Inने 9 ऑक्टोबरला वित्तीय संस्थांना अशा हल्ल्यांबाबत सावध केले होते. मात्र, या घटनांचा SBIशी संबंधित कथित डेटा चोरीशी थेट संबंध असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.
RBIचे नियम काय?
RBIने जुलै 2026मध्ये जारी केलेल्या निर्देशांनुसार, बँकेला सायबर घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहा तासांच्या आत DAKSH प्लॅटफॉर्मवर त्याची नोंद करावी लागते. CERT-Inलाही माहिती देणे बंधनकारक आहे. याशिवाय बँकांना घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय करावे लागतात.
CERT-Inच्या 2022मधील निर्देशांनुसारही ठरावीक प्रकारच्या सायबर घटनांची माहिती सहा तासांत देण्याची तरतूद आहे.
SBIचा ग्राहकांना इशारा
SBIच्या अधिकृत माहितीनुसार, डिजिटल बँकिंग सेवांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी विविध सुरक्षा उपाय, ऑथेंटिकेशन कंट्रोल आणि एन्क्रिप्टेड कम्युनिकेशनचा वापर केला जातो.
बँकेने ग्राहकांना पासवर्ड, PIN आणि OTP कोणालाही देऊ नये, असा सल्ला दिला आहे. बँकेच्या नावाने आलेल्या संशयास्पद संदेशांना किंवा माहिती मागणाऱ्या लिंकला प्रतिसाद देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, Siriusimने केलेल्या डेटा चोरीच्या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. कथित डेटा खरा आहे का आणि SBIच्या ग्राहकांची माहिती प्रत्यक्षात उघड झाली आहे का, हेही स्पष्ट झालेले नाही.





