नसरापूरला अवतरली सावित्रीबाईंची शाळा

कापूरहोळ – नसरापूर (ता. भोर) येथील शंकरराव भेलके महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या शाळेची प्रतिकृती तयार करून 1 जानेवारी 1848 चा वर्ग पुन्हा भरविला. या उपक्रमामुळे सावित्रीबाई फुले यांची शाळा 172 वर्षानंतर नसरापूरात पुन्हा अवतरली होती.
प्राचार्य डॉ. नारायण टाक यांच्या कल्पनेतून सावित्रीबाईंच्या पाहिल्या शाळेची प्रतिकृती साकार झाली. या उपक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थीनींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शाळेची प्रतिकृती सादर करताना सावित्रीबाईंची भूमिका आचल खुटवड या विद्यार्थीनीने साकार केली. फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या नॉर्मन स्कूलमध्ये तयार झालेल्या पहिल्या शिक्षिका फातिमा शेख यांची भूमिका अंकिता कोळपे हिने सादर केली.
पहिल्या शाळेत 1 जानेवारी 1948 रोजी अन्नपुर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनु पवार, जानी करडीले या विद्यार्थीनी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या भूमिका अनुक्रमे साक्षी खुटवड, स्नेहल यादव, सायली गायकवाड, शिवानी सावंत, धनश्री शिंदे या विद्यार्थीनींनी सादर केल्या. शाळेची प्रतिकृती तयार करण्यात प्रा. संदीप लांडगे, प्रा. पी. वाय. गायकवाड, प्रा. भगवान गावित, प्रा. अतुल मरेवाड यांनी पुढाकार घेतला.





