पुणे | बचतगटांना बसणार आचारसंहितेचा फटका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लाडकी बहीण योजनेद्वारे अनुदानातून बचतगटांना आर्थिक हातभार दिला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या बचतगटांची दिवाळीसाठीची उत्पादने पडून राहण्याची शक्यता आहे.
निवडणूक आचारसंहितेचे कारण देत दिवाळी बचत बाजार यंदा न भरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
त्याचा फटका सुमारे हजार बचतगटांना बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ५० ते ६० लाखांचे उत्पन्नही बुडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने विशेष मान्यता घेऊन हा उपक्रम यंदाही राबवावा, अशी मागणी बचतगटांनी केली आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून बचतगटांना अनुदान दिले जाते. यातून काही बचतगट वर्षभर; तर काही बचतगट सणांच्या कालावधीत वस्तूंची उत्पादने तयार करतात.
प्रामुख्याने दिवाळीत घरगुती साहित्य, दिवाळी फराळ तसेच इतर वस्तूंची उत्पादने बचतगटांंकडून विक्रीसाठी तयार केली जातात. या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून बचत बाजार भरवले जातात.
शहरात चारही दिशांना पाच ठिकाणी हे बाजार भरविले जातात. त्यात सुमारे हजार बचतगटांचे स्टाॅल असतात. चार दिवस भरविल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात तब्बल ५० ते ६० लाख रुपयांच्या मालाची विक्री होते. परिणामी, बचतगटांना त्याचा आर्थिक फायदा होतो.
महापालिकेचे निवडणूक आयोगाकडे बोट
निवडणुकांची आचारसंहिता दसऱ्यानंतर केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता काळात हे प्रदर्शन भरविता येणार नसल्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे पालिकेने या बाजारांसाठी आवश्यक असलेल्या तयारीच्या कामाच्या निविदाही काढलेल्या नाहीत.
तर, ही प्रदर्शने भरवायची असल्यास निवडणूक आयोगाची विशेष मान्यता घेणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर नसल्याने आयोगास पत्रही पाठविणे शक्य नसल्याने यंदा हे बचत बाजार भरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वर्षी दिवाळीत निवडणूक आचारसंहिता असेल. त्यामुळे यंदा हे बाजार भरविता येणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही निविदा काढलेल्या नाहीत. मात्र, आयोगाकडे पत्रव्यवहार केला जाणार असून, विशेष बाब म्हणून या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.





