Junnar Election Result: मतमोजणीसाठी शहरात कडक बंदोबस्त! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – जुन्नर नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि. २१) पंचायत समिती सभागृहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम लागू करण्यात आले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
विजयी उमेदवारांना विना परवाना डॉल्बी, डीजे किंवा ध्वनीक्षेेपकांचा वापर करून मिरवणुका काढता येणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिला आहे.निवडणुकीच्या रिंगणात असलेले नगराध्यक्ष व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची बैठक जुन्नर पोलीस ठाण्यात पार पडली. या बैठकीत पोलीस प्रशासनाने मतमोजणीनंतर घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मतमोजणीच्या ठिकाणी अधिकृत पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निकालानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त कमेंट्स किंवा मेसेज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विजयी उमेदवारांनी जल्लोष करताना किंवा रॅली काढताना पराभूत उमेदवारांविरोधात घोषणाबाजी करू नये आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उद्या सकाळी आठपासून मतमोजणीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, २ पोलीस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, ११० पोलीस कर्मचारी, ५५ होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी असा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जुन्नर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी संपूर्ण शहरात पथ संचलन करून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे किंवा साउंड सिस्टीम जप्त केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





