Nagar | सावेडीचे नाट्यगृह बनले तळीरामांचा अड्डा : किरण काळे

नगर, (प्रतिनिधी) – निधी उपलब्ध असून, कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सावेडी नाट्यगृह उभारणीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कधी सुरू होते तर ते लगेच बंद पडते. तब्बल एक दशकापासून हे काम रखडलेले आहे.
याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी करत सोशल मीडियातून लाईव्ह पोलखोल केली असता अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
विविध ब्रँडच्या दारू, बियर, सोडा वॉटरच्या बाटल्या, सिगरेटची पाकीटं, माव्याच्या पुड्या यांचा अक्षरशः खच त्या ठिकाणी आढळून आला आहे.
हा तळीरामांचा अड्डा बनला आहे. काळे यांनी या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह पोलखोल केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून नगरकरांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत आहे.
शहर काँग्रेसकडून शहरभर पोस्टरबाजी करत सुरू असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या ‘जुन्या विश्वासाच्या’ दाव्याचा पोलखोल सप्ताह राबविला जात आहे. त्याच्या दुसऱ्या चरणात हा धक्कादायक प्रकार किरण काळे यांनी नगरकरां समोर आणला आहे.
यावेळी काळे म्हणाले, नाट्य, संगीत, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत, नाट्य रसिक आणि तमाम नगरकरांसाठी ही संतापजनक बाब आहे.
मनपा, राज्य आणि देशात यांची एक हाती सत्ता असताना साधं मनपाच्या स्वमालकीच नाट्यगृह हे उभारू शकत नसतील तर नगरकरच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सत्तेच्या शिखरावरून कडेलोट करतील, असा घाणाघात काळे यांनी केला आहे.
चार महिन्यात गाळे उभे राहिले, नाट्यगृह १० वर्ष का रखडले ? :
सावेडी नाट्यगृह ही शहराच्या वैभवात भर घालणारी वास्तू होती. सुंदर वास्तु उभी राहण्यापूर्वीच या वास्तूच्या दर्शनी भागासमोरच अति जलद अशा विक्रमी चारच महिन्याच्या काळात गाळे उभारले गेले. मात्र मनपाने दर्शनी भागच झाकून टाकत या वास्तूची वाट लावली.
सत्ताधाऱ्यांचेच बगलबच्चे याचे लाभार्थी आहेत. चार महिन्यात गाळे उभे केले, मात्र दहा वर्षात यांना साधं नाट्यगृह का उभारता आलं नाही, असा संताप सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
नाट्यगृहाच्या जागेच यांनी डंप यार्ड केलं :
मनपा आणि स्वयंघोषित कार्यसम्राटांच्या नावाने सोशल फाउंडेशनच्या गाड्या शहरभर स्वच्छता मोहीम राबवत असल्याचा दिखावा सुरु आहेत. प्रत्यक्षात या मनपाच्या स्वमालकीच्या जागेत कचरा, घाणीचे साम्राज्य आहे.
जागोजागी गवत उगवले आहे. यातून डेंगू, साथीचे आजार पसरत नाहीत का ? शहरातील कचरा गोळा करून या जागेचे डंप यार्ड केले गेले आहे. ही अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.





