Satyendra Jain Arrested : मोठी बातमी! माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी कारवाई
Satyendra Jain Arrested : दिल्ली जल बोर्डाच्या STP टेंडरमधील कथित भ्रष्टाचारप्रकरणी माजी मंत्री सत्येंद्र जैन, माजी CEO उदित प्रकाश राय यांच्यासह सहा जणांना ACBने अटक केली.

Satyendra Jain Arrested : दिल्लीच्या केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह दिल्ली जल बोर्डाचे (DJB) माजी सीईओ आणि आयएएस अधिकारी उदित प्रकाश राय यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (ACB) अटक केली आहे. सीवेज ट्रीटमेंट प्लांट (STP)च्या निविदांमध्ये कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ACBने एकूण सहा जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सत्येंद्र जैन, उदित प्रकाश राय, DJBचे माजी कंत्राटी सल्लागार अंकित श्रीवास्तव, AN Enterprisesचे मालक नागेंद्र यादव, Eurotech Environment Pvt. Ltd.चे मालक राजा कुमार कुर्रा आणि सृजनहारचे मालक पंकज वर्मा यांचा समावेश आहे.
STP टेंडरमध्ये मोठ्या अनियमिततेचा आरोप
ACBचे संयुक्त पोलीस आयुक्त विक्रमजीत सिंह यांच्या माहितीनुसार, STPच्या क्षमतेत वाढ आणि त्याच्या अपग्रेडेशनसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. निविदेच्या अटींमध्ये कथित फेरफार करून विशिष्ट तंत्रज्ञान आणि त्याचा पुरवठादार Eurotech यांना फायदा करून देण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचा ACBचा दावा आहे.
यामुळे निविदेतील स्पर्धा मर्यादित झाली आणि सरकारी तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.
या प्रकरणी ACBने 11 मे 2024 रोजी FIR दाखल केली होती. यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कटाच्या कलमांचा समावेश आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा संपूर्ण व्यवहार आणि त्यातून मिळालेल्या रकमेचा तपास अद्याप सुरू असल्याचे ACBने सांगितले.
ई-मेल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांतून धागेदोरे
तपासादरम्यान खासगी कंपन्या आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने संपर्क असल्याचे समोर आल्याचा ACBचा दावा आहे. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या तपासणीत निविदेतील प्रतिबंधात्मक अटी, कॉरिजेंडम आणि इतर कागदपत्रांची देवाणघेवाण झाल्याचे आढळले.
यातील काही अटी नंतर DJBच्या STP निविदांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ACBने म्हटले आहे.
माजी CEOच्या खात्यांमध्ये 1.52 कोटी रुपये?
ACBच्या दाव्यानुसार, तत्कालीन DJB CEO उदित प्रकाश राय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये AN Enterprisesच्या माध्यमातून सुमारे 1.52 कोटी रुपये पोहोचले. तपास यंत्रणेने ही रक्कम कथित लाच म्हणून नमूद केली आहे.
या पैशांचा वापर अचल संपत्ती खरेदीसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच AN Enterprisesच्या खात्यात ही रक्कम Eurotechशी संबंधित संस्थांच्या माध्यमातून आल्याचेही तपासात समोर आल्याचे ACBने म्हटले आहे.





