पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघात १९८३ मध्ये झालेल्या अन्यायानंतर पाटणच्या स्वाभिमानी जनतेने उठाव करून अक्षरशः वर्गणी गोळा करुन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना विजयी केले. त्याचीच पुनरावृत्ती आता २०२४ मध्येही करण्याची वेळ आली आहे. आता या निवडणुकीत आपण गट, तट, पक्ष या सगळ्या बाबी बाजूला ठेवत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाठीशी आपली ताकद पूर्णपणे उभे करावी. यापुढे सत्यजितसिंह पाटणकर हाच आपला पक्ष आणि हेच आपले उमेदवार व चिन्ह. हे स्वीकारून प्रत्येकाने कामाला लागण्याचा निर्धार येथे झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते निर्धार मेळाव्यात करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामेही सादर केले. महाविकास आघाडीकडून पाटण मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. याठिकाणी सत्यजितसिंह पाटणकर राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे प्रमुख दावेदार होते. मात्र, त्यांची उमेदवारी डावलल्याने मतदारसंघात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित निर्धार मेळावा घेत आपणच उमेदवार ही संकल्पना जाहीर करत सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून आणायचा निर्धार केला व कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढाईची आणि जिंकायची असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी मतदारसंघातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांनीही मार्गदर्शन केले. यात माजी शिक्षण सभापती राजेश पवार, टाटाचे कामगार नेते सुजित पाटील, पंचायत समिती माजी सभापती राजाभाऊ शेलार, खरेदी विक्री संघ चेअरमन ॲड. अविनाश जानुगडे, तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार आदींची भाषणे झाली. १९८३ मध्ये उठाव करून जनतेने तालुक्यात नव्या नेतृत्वाला जन्म दिला, त्याचीच पुनरावृत्ती आता येणाऱ्या २३ नोव्हेंबरलाही करावी लागणार आहे. आता वाट्टेल त्या परिस्थितीत आपण लढायचं आणि जिंकायचं हे निश्चित आहे, असा निर्धार वक्त्यांनी केला. संभाजीराव पाटणकर, वाय. के. घाडगे, आबासाहेब भोळे, सुभाषराव पवार, राजेश पवार, सुजित पाटील, विठ्ठल डिगे, शंकर घाडगे, शंकर शेडगे, संजय इंगवले, विश्वजित पाटणकर, सुहास माने, अभिजित जाधव, मधुकर पाटील, ॲड. चेतन कणसे, लहूराज कदम, ॲड. अविनाश जानुगडे, वामनराव साळुंखे, सचिन जाधव, पोपट खेडेकर, हणमंतराव अवघडे, रमेश मोरे, ए. डी. साळुंखे, रमेश शिंदे, सम्राट मुळे, बाळासाहेब कदम, बबनराव कांबळे, संजय हिरवे, रमेश नावडीकर, पंकज गुरव, समीर कदम, साहेबराव गायकवाड, रामभाऊ सपकाळ, विजय चव्हाण, अक्षय शिंदे, शंकर पाटील, अक्षय देसाई, नथुराम मोरे आदी बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्ध्या तासातच मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी गोळा कोणतीही महासत्ता व पक्षाशिवाय अपक्ष लढण्याचा निर्धार यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केल्यानंतर सर्वसामान्य दूधवाला, रिक्षावाला, नाभिक बंधू ते थेट कामगार, कार्यकर्ते, मतदारांनी आपापल्या परीने या निवडणुकीसाठी आर्थिक, राजकीय, सामाजिक हातभार लावण्याचा निर्धार केला. अवघ्या अर्ध्या तासातच निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी स्वखुशीने गोळा करण्यात आली. अनेक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या एका महिन्याचा पगार तर अनेकांनी आपल्या वाहनांसह निवडणुकीसाठी लागणाऱ्या यंत्रणांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामेही जाहीर केले. या निवडणुकीतील हा सार्वत्रिक उठाव निश्चितच सत्यजितसिंह पाटणकर यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जनता उठाव करणार असल्याने विजय निश्चित कठीण काळातच आपलं कोण, परकं कोण हे समजतं. त्यामुळे गट, तट, पक्ष विसरून आता ज्या पद्धतीने १९८३ मध्ये मला पाठिंबा मिळाला, मतदारसंघात उठाव झाला त्याच पद्धतीचा उठाव मला आत्ताही पाहायला मिळतोय. अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्ती, मित्रपक्ष आपल्या सोबत येतीलच. तुम्ही काळजीच करू नका. ज्यावेळी जनता उठाव करते त्यावेळी निश्चितच आपला विजय होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते, असा विश्वास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला. सोमवारी आपण उमेदवारी अर्ज दाखल करू, आपण अपक्ष लढायचं की वेगळी भूमिका घ्यायची हा सर्वस्वी निर्णय जनता घेईल, असे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले. येथे झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या लढाईत पुरुष, महिला, तरुण यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कोणी वर्गणी किती दिली त्यापेक्षा त्या पाठीमागच्या भावना तुम्हाला लढायचं बळ देतात आणि हेच आपल्या जन्माचं खरं भांडवल असतं. स्वाभिमानी कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार निश्चितच तुमच्या पाठीशी राहतील. कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुमच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरतील. तुमची पिढी आदर्श, यशस्वी करायची असेल तर निश्चितच तुम्हाला आता या संघर्षातून तावून सुलाखून निघायचं आहे. त्यामुळे तुमचा पक्ष, तुमचं चिन्ह जनता जनार्दन ठरवेल. तुम्ही आता कामाला लागा आणि वाटेल त्या परिस्थितीत विजय मिळवा, असे आवाहनही विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आपल्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती असली तरी आपत्ती ही इष्टापती समजून आपण कामाला लागायचं आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणाचा स्तर घसरत असताना व मागील दहा वर्ष सत्तेत नसतानाही आपण आपला पक्ष,गट टिकवला. आपल्या अंगावर अनेक वार झाले, प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास, दबाव, खोट्या केसेस, जेलमध्ये टाकण्याचे प्रकार घडले. मात्र, तरीही कार्यकर्त्यांनी कधीही आपली निष्ठा व भावना सोडली नाही. एवढा निष्ठावंत फक्त पाटण मतदारसंघातच पहायला मिळतो याचा मला सार्थ अभिमान आहे. या निवडणुकीतही निष्ठेने प्रामाणिकपणे एकत्रित आलो तर माझं भविष्य हा माझा निष्ठावंत मतदारच ठरवणार आहे. आपण लढायला कधीही घाबरलो नाही, संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजला आहे. तुमचा निर्धार निश्चितच आपल्याला विजयाकडे येणार आहे, अशी खात्री सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली.