Satyajeet Tambe : बेरोजगारीचा फायदा घेऊन तरुणांची फसवणूक; सत्यजीत तांबे यांची विधानसभेत माहिती
पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, लेटरहेड, शिक्के, सेवा पुस्तके, पगार पावत्या, पदोन्नती व बदली आदेश तयार करून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात (Satyajeet Tambe) तातडीने कठोर कारवाई करावी.

Satyajeet Tambe : पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, लेटरहेड, शिक्के, सेवा पुस्तके, पगार पावत्या, पदोन्नती व बदली आदेश तयार करून बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात (Satyajeet Tambe) तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच खासगी कंपन्यांच्या बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवणुकीचाही सखोल तपास करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे केली.
आमदार तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले, राज्यात पेपरफुटी, भरती घोटाळे आणि सरकारी नोकऱ्यांमधील भ्रष्टाचारानंतर आता खासगी क्षेत्रातही बेरोजगार तरुणांच्या असहायतेचा गैरफायदा घेणारे रॅकेट सक्रिय आहे. पुण्यात अनुभव नसलेल्या तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा फायदा घेत काही टोळ्या बनावट अनुभव प्रमाणपत्रे, सॅलरी स्लिप, पीएफ रेकॉर्ड, फॉर्म-१६, आयकर कागदपत्रे आणि इतर दस्तऐवज तयार करून लाखो रुपये उकळत आहेत.
यामध्ये अनेक निष्पाप तरुण अडकत असून त्यांच्या करिअरवर गंभीर परिणाम होत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि विविध अधिकृत कागदपत्रे तयार करून नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. एका उमेदवाराकडून तब्बल ४५ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी तक्रार दाखल होऊनही संबंधित आरोपींवर ठोस कारवाई झालेली नसल्याने या प्रकरणामागे प्रभावशाली व्यक्तींचा हात असल्याचा संशय निर्माण होत असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले. यावेळी तांबे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दोन ठोस प्रश्न विचारले.
पुणे महानगरपालिकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपींवर अद्याप अटक का झाली नाही? तसेच खासगी क्षेत्रातील बनावट अनुभव प्रमाणपत्रांच्या वाढत्या रॅकेटला आळा घालण्यासाठी सरकारची भूमिका काय आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणातील तक्रारदाराने नंतर तक्रार मागे घेतली असली तरी वारंवार समोर येणाऱ्या संबंधित व्यक्तीची निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली जाईल. आवश्यक माहिती उपलब्ध झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






