Satish Raut : ‘मामुर्डीच्या भूमिपुत्राचा नागरी सन्मान’ ! सतीश राऊत यांना अप्पर जिल्हाधिकारीपदी बढती

देहूरोड – मामुर्डी : मामुर्डी गावचे सुपुत्र सतीश राऊत यांना पुणे अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मामुर्डी गाव आणि शिवशक्ती तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा नुकताच नागरी सन्मान करण्यात आला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राऊत यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आणि प्रशासनात उच्च स्थान प्राप्त केले. त्यांच्या उत्कृष्ट आणि पारदर्शी कार्यशैलीमुळे त्यांना वारंवार उच्च पदावर बढती मिळत गेली.
सतीश राऊत यांनी यापूर्वी तहसीलदार पद तसेच इतर अनेक महत्त्वाच्या उच्च पदांवर काम केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही अनेक वर्षे महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या हिताची कामे केली, ज्यामुळे जनमानसात त्यांनी एक आदराचे स्थान मिळवले आहे.
कुशल, सक्षम आणि जनहित जपणारे अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनात उत्तम नावलौकिक मिळवला आहे. अशा या आदर्शवत भूमिपुत्राचा सन्मान सोहळा मामुर्डी गावच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अभिमान आणि कौतुकाचा विषय ठरला. सन्मान सोहळ्यानिमित्त मामुर्डी गावात सतीश राऊत यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पहार घालून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि मनोगत व्यक्त केले.
या सन्मानाप्रसंगी सेवानिवृत्त आयएएस जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि महसूल अहर्ता परीक्षा उत्तीर्ण बळवंत राऊत (एमपीएससी) यांच्या हस्ते, ग्रामस्थांच्या वतीने सतीश राऊत यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी हवेलीचे तहसीलदार जयराज माने, ह.भ.प. महाराज मुकुंद राऊत, सुरेश गव्हाणे, काशिनाथ जाधव सर, सूर्यकांत मराठे, ॲड. कैलास पानसरे, किशोर राऊत, दत्तात्रय राऊत, ॲड. कृष्णा दाभोळे, दिलीप राऊत, धर्मपाल तंतरपाळे, मोहन राऊत, राजेंद्र तरस, निलेश राऊत, गणेश राऊत, जालिंदर राऊत, बाळासाहेब काशीद, नंदकुमार राऊत, लहू शेलार यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वारकरी पंथातील अनेक मान्यवर आणि समस्त मामुर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त नायब तहसीलदार बळवंत राऊत यांच्या प्रेरणादायी मनोगताने झाली.





