Pimpri : देहूरोड शहरातील रस्त्यांनी घेतला ‘मोकळा श्वास’

देहूरोड : ‘नागरी समस्यांकडे बोर्डाची डोळेझाक’ या मथळल्याखाली दैनिक प्रभातने, दिनांक २६ फेब्रवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करून देहूरोड शहरातील नागरिक समस्यांचा पाढा वाचला होता. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमणे वाढल्याचे दै. प्रभातने समोर आणले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या बोर्ड प्रशासनाने बुधवारी (दि.५) शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली.
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी (दि.५) भाजी मंडई व अबुशेठ रोडवरील सुमारे ३० अतिक्रमणांवर कारवाई केली. तसेच अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही कायम राहणार असून शहरातील अतिक्रमणे हटविली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. बोर्डाच्या या कारवाईने रस्ते आता मोकळे श्वास घेत आहेत. दै. प्रभातच्या बातमीमुळे अतिक्रमण मुक्त शहर होत असल्याबद्दल नागरिकांनी प्रभात वर्तमानपत्राचे आभार मानले आहेत.
बाजारपेठ, अबुशेठ रोड, डॉ. आंबेडकर मार्गावर व्यवसायिकांनी पत्र्यांचे शेड व सिमेंट काँक्रिटीकरण ओटे बांधून रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. तसेच फळ विक्रेते, भाजीपाले, हातगाडीवाले, पथारीवाले यांनीही रस्त्यांवरच अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले होते. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद-विवाद होत होते. यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा देहूरोड पोलीस ठाणे व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
दैनिक प्रभात ने देखील या संदर्भातील वृत्त अनेकदा प्रसिद्ध केले होते. अखेर नागरिकांच्या मागणीची व दै. प्रभातच्या वृत्ताची दखल घेत, बोर्डाच्या मुख्याधिकारी पुष्पांजली रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी ११ ते २ यावेळेत मुख्य बाजार पेठ, भाजी मंडई, अबूशेठ रोडवरील रस्त्यावर आलेली अतिक्रमणे पाडण्यात आली. पत्राशेड व सिमेंटचे ओटे असे जवळपास ३० अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. संरक्षण विभागाची एक क्युआरटी वाहन, जेसीबी यंत्र, लष्करी जवान, बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.





