बंगळुरू : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा साईल यांना अटक केली आहे. ही कारवाई राज्यातील कथित बेकायदेशीर लोहखनिज निर्यातीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कन्नडमधील कारवार विधानसभा मतदारसंघातील आमदार साईल यांना मंगळवारी रात्री उशिरा चौकशी केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची कोठडीत सुनाविण्यात आली. गेल्या महिन्याच्या अखेरीस, एजन्सीने चित्रदुर्गाचे आमदार केसी वीरेंद्र उर्फ पप्पी यांना कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. २०१० मध्ये कर्नाटक लोकायुक्तांनी दाखल केलेल्या एका प्रकरणाने ईडीची चौकशी सुरू झाली. ज्यामध्ये बेल्लारीहून बेलेकेरी बंदरात सुमारे आठ लाख टन बेकायदेशीरपणे वाहतूक केलेले लोहखनिज उघड झाले. या प्रकरणात ईडीने १३-१४ ऑगस्ट रोजी कारवार, गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे छापे टाकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, छापे टाकलेल्या संस्थांमध्ये आशापुरा माइनकेम, श्री लाल महाल, स्वस्तिक स्टील्स (हॉस्पेट), आयएलसी इंडस्ट्रीज, श्री लक्ष्मी वेंकटेश्वर मिनरल्स यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.