Satish Bhosle : ‘वीस-पंचवीस जण आले अन् आमच्या सोबत…’; खोक्या भाईच्या भावजयीचा धक्कादायक खुलासा, ‘त्या’ रात्री काय घडलं पाहाच

Satish Bhosle | भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या ‘सतीश’ ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेतले आहे.
सतीश भोसलेने एका तरुणाला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. अखेर 6 दिवसांनंतर तो सापडला आहे.
त्यानुसार आता प्रयागराज पोलीस खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोर खोक्यानं माध्यमांना मुलाखती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
दरम्यान, खोक्याचं घर हे वनविभागाच्या जागेत असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर वनविभागाकडून त्याला नोटीस देखील देण्यात आली होती. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अखेर गुरुवारी वनविभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं, त्याचं घर पाडण्यात आलं.
मात्र त्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली. याबद्दल आता त्याच्या नातेवाईकांकडून माहिती समोर आली आहे. खोक्याची भावजयी अर्चना भोसले यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “रात्री आमचे लेकबाळ येथे झोपले होते, आमच्या शेळ्या मारून टाकल्या, कोंबडे घेऊन गेले, मुलींना सुद्धा खूप मारलं. ते लोक म्हणत होते तुमचे घर पाडले तुम्ही इथे कसे राहता तुमचा काय संबंध आहे. वीस पंचवीस जण होते. आता या प्रकरणात फडणवीस साहेबांनी कारवाई केली पाहिजे, आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी अर्चना भोसले यांनी केली आहे.
‘काल आम्ही इथे झोपलो होतो, त्याचवेळी ही घटना घडली आहे. मारहाण करण्यात आली. आम्ही सर्वजण सरकारी दवाखान्यात आहोत, आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शालन भोसले (दुसरी भावजयी) यांनी केली आहे. मात्र, आता यावर घटनेवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खोक्या भाईचे कारनामे….
खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसलेने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली.
त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. याशिवाय खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे.
तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.





