सतीश ऊर्फ खोक्या भोसले अखेर सापडला; प्रयागराजमधून केली अटक

Satish Bhosle | भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेतले आहे.
सतीश भोसलेने एका तरुणाला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. अखेर 6 दिवसांनंतर तो सापडला आहे. त्यानुसार आता प्रयागराज पोलीस खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करतील. पोलिसांनी दोन पथकं नेमून देखील त्याला अटक करण्यात आली नव्हती. धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोर खोक्यानं माध्यमांना मुलाखती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
सतीश उर्फ खोक्या भोसलेचे कारनामे
खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसलेने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. याशिवाय खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
दरम्यान, सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यानंतर खोक्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अखेर त्याला प्रयागराजमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:





