Satej Patil : २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर घडवणार; परिवर्तनाचं बीज कोल्हापुरातून पेरलं गेलंय : सतेज पाटील
Satej Patil : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Satej Patil : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोकुळवर प्रशासक नियुक्ती आणि त्यानंतर शासनाकडून चार संचालकांची नियुक्ती करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा निर्धार व्यक्त करत परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून झाल्याचा दावा त्यांनी केला. (Satej Patil)
संघर्षमोर्चानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. “महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाचं बीज कोल्हापुरातून पेरलं गेलं आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला राजकीय इशारा दिला. (Satej Patil)
‘सरकार सहकार क्षेत्र मोडून काढत आहे’
गोकुळची निवडणूक प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. गोकुळवर प्रशासक नियुक्त करू नये, असं आवाहन आम्ही सरकारला केलं होतं. मात्र, सरकारने प्रशासक नियुक्त केला. त्यानंतर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली. (Satej Patil)
राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असून सहकार कायदा पायदळी तुडवला जात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. सहकार क्षेत्र मोडून काढण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. (Satej Patil)
‘मी समोर येऊन लढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही’
गोकुळच्या प्रश्नावर न्यायालयीन लढाई सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांनी भूमिका घेतली नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. संघर्षाच्या काळात राजू शेट्टी, गणपतराव पाटील आणि सत्यजित पाटील यांनी साथ दिल्याचं त्यांनी सांगितलं. (Satej Patil)
“तुम्ही मला सोडून गेलात म्हणून मी घाबरणारा नाही. मी समोर येऊन लढतो, तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Satej Patil)
‘मी शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तुम्ही मुलासाठी’
गोकुळच्या निवडणुकीवरून विरोधकांवर टीका करताना सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला. आपण साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तर विरोधक स्वतःच्या कुटुंबासाठी निवडणूक लढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Satej Patil)
तसेच, आपण कधीही जातीयवाद केला नसल्याचं सांगत विरोधकांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मुलाच्या निवडणुकीतील पराभवाचा वारंवार उल्लेख केला जातो; मात्र इतर जातींतील उमेदवार पराभूत झाले, तेव्हा त्याबाबत का बोललं गेलं नाही, असा सवालही त्यांनी केला. (Satej Patil)
‘गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव’
गोकुळ दूध संघ अमूलच्या ताब्यात देण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही सतेज पाटील यांनी केला. शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांची नावे त्यांनी सभेत वाचून दाखवली. यामध्ये शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, ॲड. प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात पाटील यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. (Satej Patil)
यापैकी ॲड. प्रशांत भगवान पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा उल्लेख करत, शासनाला कोल्हापूर जिल्ह्यात एक पात्र सदस्य मिळाला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Satej Patil)
Satej Patil : “गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव..”; सतेज पाटील यांचा मोठा आरोप





