Pune News : पुण्यात आगीच्या ३० हून अधिक घटना; फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे झाडे, घरे, दुकाने आणि गोदामे पेटली; अग्निशमन दलाची धावपळ
Pune News : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे शहरात फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे ३० हून अधिक ठिकाणी आगी लागण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत.

Pune News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुणे शहरात ३० हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. दुपारी तीन ते रात्री नऊ या सहा तासांत अग्निशमन दलाकडे आगीच्या २४ वर्दींची नोंद झाली. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे झाडे, गवत, कचरा, घरांच्या गॅलरी, इमारतींचे टेरेस, दुकाने आणि गोदामांना आग लागली. (Pune News)
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. या आतषबाजीदरम्यान फटाक्यांच्या ठिणग्या पडल्याने विविध ठिकाणी आग लागल्याचे समोर आले. (Pune News)
कोंढवा येथील कडनगर चौकातील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग लागली. धायरीतील डीएसके विश्व परिसरातील मोकळ्या मैदानातील गवत, शिवाजीनगरमधील शिरोळे रस्त्यावरील झाड आणि काशेवाडीतील हरकानगर परिसरातील कचऱ्याने पेट घेतला. (Pune News)
सायंकाळनंतर आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सदाशिव पेठेतील नागनाथ पार, वडगाव बुद्रुक, कात्रज, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड, नाना पेठ, भवानी पेठ, खराडी, टिंगरेनगर, शुक्रवार पेठ, गंज पेठ, पाषाण आणि वारजे परिसरात आगीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी इमारतींच्या गॅलरी आणि फ्लॅटमध्ये, तर काही ठिकाणी झाडे आणि मोकळ्या जागेतील गवताला आग लागली. (Pune News)
फुरसुंगी येथील गोदामालाही आग लागली. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी धाव घेतली. आवश्यक यंत्रणा तैनात करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. (Pune News)
सिटीप्राईडजवळ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला आग
सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ सोनावणे इंडस्ट्रीज येथील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते. (Pune News)





