Jaykumar Gore : गावखेड्यातील प्रत्येकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
Jaykumar Gore : प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्यासाठी 'महाराजस्व अभियान'; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मलवडीतून गावकऱ्यांना शब्द.

Jaykumar Gore – गावखेड्यातील प्रत्येक माणसाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यातून त्यांच्या शासन दरबारी असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात, हा महाराजस्व शिबिराचा उद्देश असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मलवडी (ता. माण) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम व अर्जुन काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सरपंच दिपाली जगदाळे, किसन सस्ते, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, योगिता ढोले, खुशबू चौधरी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. गोरे म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामस्थांना सातत्याने हेलपाटे मारावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. तो बंद व्हावा, गावात जाऊनच लोकांचे प्रश्न सोडवायचे, वाद मिटवायचे असा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर, औजारे यांना अनुदान देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मदत करुन त्यांना सक्षम करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी प्रगतशील महिला शेतकरी म्हणून राणी सावंत (कुळकजाई, दुग्ध व्यवसाय), निशीगंधा सातपुते (पिंपरी, सेंद्रीय गट शेती) व पुजा सुर्यवंशी (भांडवली, कृषी सखी उत्कृष्ट कामगिरी) यांचा तसेच श्रीराम व सितामाई महिला शेतकरी गट यांचा उत्कृष्ट गटशेतीबद्दल सन्मान करण्यात आला. संजय गांधी योजना लाभार्थी प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर, जातीचा, उत्पन्न आदी दाखले देण्यात आले. कृषी विभागाकडून रोटावेटर, ट्रॅक्टर आदींचे वितरण करण्यात आले.





