सातारा : मेढ्याजवळ कण्हेर जलाशयात युवक बेपत्ता

विजेचा धक्का लागल्याने दुर्घटना; शोध सुरू
मेढा : जवळवाडी (मेढा) येथील सिध्देश विष्णू जवळ (वय १८ ) याचे आज सकाळी साडेसातच्या दरम्यान मेढा मोहाट पुलाच्या खालच्या बाजूस कण्हेर जलाशयाच्या नदीपात्रात पोहत असताना पाण्याच्या फुगवट्यावरून दीड ते दोन फूट अंतरावरून गेलेल्या वीजेच्या तारेला हात लागल्याने शॉक लागून तो जागीच पाण्यात बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम बोलविण्यात आल्या आहेत.
सिध्देश हा आई-वडीलांना एकुलता एक मुलगा आहे. संपूर्ण जवळवाडी- मेढा परिसरातील लोक नदीकाठावर उभे असून कण्हेर धरण भरलेले असल्याने रेस्क्यू टीमची वाट पाहत आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तातडीने सकाळी घटनास्थळी भेट देऊन पोलिस बंदोबस्त घटनास्थळी ठेवला आहे. विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता सुरेंद्र भुतकर यांनीही येथे घटनास्थळी येऊन पाहणी केली. वरीष्ठांना याबाबतची माहिती दिली.
माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आणि व्यसनमुक्त संघाचे माजी राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ, सचिन करंजेकर, सचिन जवळ यांनी येथे थांबून सर्व शासकीय यंत्रणा व रेस्क्यू टीमला माहिती कळविली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे व शिवसेनेचे नेते एस. एस. पार्टे गुरुजी यांनीही घटनास्थळी भेट दिली. मेढा मोहाट पुलावर मोठी गर्दी झाली आहे .





