Satara : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची वेबसाइट बंद

पुसेगाव : शासनाच्या धोरणानुसार या वर्षापासून इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. त्याचे वेळापत्रक आणि परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे. सोमवारी (दि. 19) आणि मंगळवारी (दि. 20) प्रवेश अर्ज भरण्याचा सराव चुकीच्या धोरणामुळे अपयशी ठरला. दि. 21 ते 28 या कालावधीत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी सुरू राहणार आहे.
मात्र, या प्रक्रियेची वेबसाइट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांची गेल्या ससेहोलपट होत आहे. शासनाचे नियोजन फसल्याने 11 वी प्रवेश प्रक्रियेचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. कामधंदा सोडून दिवसभर पाल्याच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात किंवा कॅफेच्या बाहेर थांबलेल्या पालकांना नाहक त्रास सोसावा लागला.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा सराव व्हावा, म्हणून शासनाने अर्ज भरण्यासाठी दोन दिवस दिले. त्याही काळात वेबसाइटमध्ये अडचणी आल्या. त्यानंतर बुधवारपासून रितसर प्रवेश प्रक्रिया वेबसाइटवर सुरू करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांना आवश्यक वेळ देण्यासाठी आणि प्रवेशाचे वेबपोटल मोबाइलवर हाताळणे सुलभ व्हावे यासाठी, पोर्टलची सुविधा काही वेळ बंद ठेवण्यात आल्याची घोषणा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केली. विद्यार्थी व पालक प्रवेश अर्ज भरण्यासाठी सकाळपासून कॅफे आणि प्रत्येक महाविद्यालयात रांग लावून बसले होते. मात्र, शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडली.
ग्रामीण भागात कित्येक विद्यार्थी व पालकांकडे अद्ययावत मोबाइल नसल्याने, फॉर्म भरताना अडचण येत आहेत. पावसाने वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, बंद असलेली वेबसाइट, सर्व्हर डाऊन, अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज न भरल्यास, ते प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. वेबसाइट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेटस्ची माहिती त्यासाठी असलेल्या व्हॉटस्अॅप चॅनेलवर लगेच माहिती देण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील कित्येकांकडे प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळण्यासाठी मोबाइल आहेत का, याची कधी शहानिशा झाली आहे का? कार्यालयात बसून अधिकार्यांनी निर्णय घेणे सोपे आहे; परंतु प्रत्यक्ष जागेवर जाऊन, परिस्थितीनुसार निर्णय घेणे आवश्यक असल्याची चर्चा ग्रामीण भागातील पालकांमध्ये आहे.
इ 11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा पहिल्यापासून विरोध आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यात प्रथमतः अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अन्यथा अॅकॅडमी, खाजगी क्लासेस, स्वयंअर्थसहाय्यीत महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिल्यास, राज्यातील अनुदानित महाविद्यालये बंद पडतील. सुट्टी असतानादेखील या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राध्यापक महाविद्यालयात उपस्थित रहात आहेत.
– प्रा. डॉ. विलास खंडाईत,
अध्यक्ष, सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.





