Satara Water Supply: धरण उशाला, कोरड घशाला! कास तलाव भरला तरी पश्चिम सातारा तहानलेला…कारण काय?
Satara Water Supply: कास तलावात समाधानकारक पाणीसाठा असतानाही सातारा शहराच्या पश्चिम भागाला दोन दिवसांपासून मनस्ताप; पाणीपुरवठा न सुधारल्यास आंदोलनाचा पवित्रा.

Satara Water Supply – एका बाजूला कास तलावात मुबलक पाणीसाठा असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला सातारा शहराच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांना दोन दिवसांपासून पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकावे लागत आहे. पॉवर हाऊस परिसरातील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम लांबल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील बोगदा, यादोगोपाळ पेठ, चिमणपुरा, व्यंकटपुरा, रामाचा गोट, पापाभाई पत्रेवाले नगर, मंगळवार पेठ आदी भागांमध्ये बुधवारी दिवसभर पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. अनेक नागरिकांना टँकरद्वारे पाणी मागवण्याची वेळ आली. पावसाळ्याच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ‘धरण भरले, पण नळ कोरडे’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगितले आहे.
बुधवारी दिवसभर हे काम पूर्ण करून गुरुवारी पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असा दावा विभागाने केला आहे. मात्र, दोन दिवस झाल्यानंतरही नागरिकांना झालेल्या मनस्तापाबाबत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तर नसल्याची भावना व्यक्त होत आहे. कास तलावात सुमारे १४.१६ अब्ज घनफूट पाणीसाठा करण्याची क्षमता असून तलावातील पाण्याची पातळीही समाधानकारक आहे. तरीही जलवाहिनीच्या गळतीमुळे शहराचा हा मोठा भाग तहानलेला राहत आहे, ही वस्तुस्थिती पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी ठरत आहे.
जलवाहिनीवर आधुनिक सेन्सर प्रणाली बसविण्यात आली असली, तरी गळतीचे अचूक निदान करुन तातडीने दुरुस्ती करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पालिकेकडे नसल्याने प्रत्येक वेळी नागरिकांनाच त्याची किंमत मोजावी लागत असल्याची टीका होत आहे. कास तलावाची उंची वाढवून पाणीसाठा वाढविण्यात आला असला तरी त्यानुसार जलवाहिन्या, वितरण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण झाले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, ‘धरण उशाला आणि घशाला कोरडा’ अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून जलवाहिनी दुरुस्ती, प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आणि भविष्यात अशा प्रकारच्या बिघाडांना प्रतिबंध करणारी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी पश्चिम साताऱ्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून, लवकरच परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






