सातारा – सांगलीकरांसाठी सोडले कोयना धरणातून पाणी

कोयनानगर – कोयनेच्या पाण्यासाठी डिग्रज (जि. सांगली) येथे नदीपात्रात केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात आले.
सांगली जिल्ह्यात सध्या जाणवणारी मोठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी ओरड होत आहे. डिग्रज येथे शुक्रवारी ग्रामस्थांनी कोयनेच्या पाण्यासाठी नदीपात्रात उतरुन आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी दूरध्वनीवरुन या पाणीटंचाई स्थितीची व आंदोलनाची माहिती शंभूराज देसाईं यांना देऊन कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली. सांगलीसाठी कोयनेतून पाणी देण्याचे आश्वासन देसाई यांनी आ. बाबर यांना दिले.
त्यानुसार कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची कार्यवाही धरण व्यवस्थापनाने केली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यातच सिंचन व विजनिर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या पाणीवाटपाचे सूत्रबद्ध पध्दतीने फेरनियोजन झाले नसल्याने पाणीवाटपात अडचण येत आहे. सध्या धरणात 89 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाचे दोन्ही वीजगृहाचे युनिट चालू करून धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी 2100 क्युसेक पाणीसाठा सोडण्यात येत असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
कोयनेच्या पाणीवाटपासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठक
कोयना धरणातील 67.50 टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी, तर 40 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी दिला जातो. 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 89 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. आतापर्यंत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 25.47 टीएमसी पाण्याचा वापर तर सिंचनासाठी 5.13 टीएमसी वापर झाला आहे. वीज प्रकल्पासाठी 37 टीएमसी तर सिंचन प्रकल्पासाठी 30 टीएमसी वापर शिल्लक आहे. सिंचनासाठी 5 टीएमसी पाणीसाठा कपात होण्याची शक्यता आहे. येत्या दोन तारखेला कोयनेच्या पाणी वाटपासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठक होण्याची शक्यता आहे.





