वाई : दि वाई अर्बन को. आँप. बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षांत 4 कोटी, 56 लाख रूपये निव्वळ नफा झाला असून नक्त एनपीएचे प्रमाण कमी राखण्यात बँकेला यश आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल मोरेश्वर देव यांनी दिली. बँकेच्या प्रधान कार्यालयात आर्थिक स्थितीचा आढावा घेताना अध्यक्ष श्री. देव बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष अनिल देव म्हणाले, जून 2023 मध्ये नवीन संचालक मंडळाने बँकेचा कारभार हाती घेतला. तत्कालीन जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्रीधर कोल्हापुरे, पालक अधिकारी जनार्दन शिंदे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने बँकेने दि. 31 मार्च, 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत मोठ्या थकीत कर्जदारांवर कठोर कायदेशीर कारवाया करून एनपीएमध्ये मोठी वसुली केली. मागील तीन वर्षात या वर्षी प्रथमच नक्त नफा 4.56 कोटी रुपये मिळविला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी दमदार कामगिरी केली आहे. बँकेचा 920 कोटी रूपयांचा एकत्रित व्यवसाय असून भक्कम तरलता राखली आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असून मागील काही वर्ष बँकेला एनपीए तरतूद करावी लागत होती. मात्र यावर्षी बँकेच्या सर्वच घटकांनी दमदार कामगिरी करून बँकेची थकीत कर्ज वसुलीवर अधिक भर देऊन वसुली केल्याने बँकेची नफाक्षमता वाढवली आहे. बँकेची गुंतवणूक रु. 350 कोटी असून सरकारी कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीतून 1 कोटींहून अधिक नफा मिळविला आहे. त्याचप्रमाणे बँकेने थकीत कर्ज वसुलीची मोठ्या प्रमाणात वसुली केल्यामुळे बँकेच्या नेटवर्थमध्येही वाढ झाली आहे. बँकेचे पदाधिकारी व संचालक मंडळ वाई अर्बन बँक परिवार व बँकेचे सभासद, खातेदार यांचे विश्वासास पात्र ठरत आहोत. बँक येत्या वर्षात दि. 31 मार्च, 2026 पर्यंत पूर्वपदावर येईल व गतवैभव प्राप्त करेल, अशी आम्हांस खात्री आहे असेही अध्यक्ष अनिल देव यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात कर्जवसुलीची व्यूहरचना समर्पकपणे राबवून बँकेला नफ्यात आणण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले, त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, ॲड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, महेश राजेमहाडिक, मकरंद मुळये, काशीनाथ शेलार, प्रितम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, अँड. सुनिती गोवित्रीकर, सौ. ज्योती गांधी, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, उपसरव्यवस्थापक संतोष बागुल उपस्थित होते.