सातारा विकास आघाडीने रिटायर्मेंट घ्यावी

सातारा, दि. 16 (प्रतिनिधी) -सातारा पालिकेमध्ये पाच वर्ष कारभार करणारे माजी नगरसेवक कुठे आहेत, प्रशासकाकडे बोट दाखविले म्हणजे काम संपले असे नाही. आता निवडणूक जवळ आल्यानंतर पुन्हा राजकीय नौटंकी चालू होतील. याचा अर्थ विकास कामे होतील असे नाही. विकास कामे करायची नसतील तर सातारा विकास आघाडीने रिटायर्मेंट घ्यावी, अशी टीका आमदार शिवेंद्रसिराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
सातारा शहरातील रिक्षा संघटनांच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांना ते म्हणाले, “प्रशासक राजवट सातारा पालिकेत चालू आहे याचा अर्थ पाच वर्ष सत्तेत काम करणाऱ्या नगरसेवकांची जबाबदारी संपली का, सातारकरांना सेवा सुविधा मिळतात की नाही हे पाहणे माजी नगरसेवकांचे काम आहे. सातारा विकास आघाडीचे नेते आणि नगरसेवक पालिकेत कुठेच दिसत नाहीत. विकास कामांची अनेक टेंडर मर्जीतल्या ठेकेदाराला मिळावीत म्हणून यांनी ती अडवून ठेवली आहेत.’
निवडणुका आल्यानंतर “पप्पी झप्पी’ची नौटंकी
हद्दवाढीनंतर नव्याने समाविष्ट झालेले शाहूनगरसारखे भाग योग्य साफसफाईअभावी कचऱ्याची बजबजपुरी बनले आहेत. सफाई कामगारांचे टेंडरसुद्धा राजकीय हेतूने मर्जीतल्या ठेकेदारांसाठी अडविण्यात आले आहेत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यानंतर “पप्पी झप्पी’ यासारखी नौटंकी करायची आणि सातारकरांना आपले म्हणत त्यांना मते मागायची. मग योग्य वेळी सातारकरांच्या विकास कामांची आठवण येत नाही का, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला. सातारा विकास आघाडीला जर काम करायचे नसेल तर त्यांनी तात्काळ रिटायर्मेंट घ्यावी, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.





