सातारा : गृहमंत्री पदाबाबत तिघे एकत्र बसून निर्णय घेणार

दरे गावातून एकनाथ शिंदेचे नाराजीनाट्यावर उत्तर; विरोधकांच्या टीकेचा समाचार
सातारा – राज्यात महायुती सरकारने लाेकाभिमुख कारभार केला असून महायुतीत कसलीही नाराजी नाही. गृहमंत्री पदाबाबत फडणवीस, अजितदादांबरोबर बसून निर्णय घेतला जाइल. “मी मुख्यमंत्री आहे, हे फक्त एक पद आहे; पण प्रत्यक्षात मी सामान्य माणूस आहे. लोकांसाठी जे करायला हवे, ते आम्ही करणारच आहोत. शेतीसाठी गावी येण्याची ही नेहमीची गोष्ट आहे. माझी गावी शेती असल्यामुळे मी येथे येत असतो. याचा नाराजीनाट्याशी काहीही संबंध नाही हे सांगत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावीसाठी आले होते. त्यामुळे शिवसेनेचे उध्दव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शनिवारी प्रकृतीच्या कारणास्तव श्री. शिंदे यांनी दरे येथेच उपचार घेतले. रविवारी मुंबइकडे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दरे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. महायुती सरकारमध्ये समन्वयाने काम सुरू आहे. जनतेने मोठे मताधिक्य दिल्याने आम्ही याचा आदर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करताना सांगितले की, “मी मुख्यमंत्री आहे, हे फक्त एक पद आहे; पण प्रत्यक्षात मी सामान्य माणूस आहे. लोकांसाठी जे करायला हवे, ते आम्ही करणारच आहोत.” तसेच, त्यांनी शेतीसाठी गावी येण्याची ही नेहमीची गोष्ट असल्याचे सांगितले. “माझी गावी शेती आहे, त्यामुळे मी येथे येत असतो. याचा नाराजीनाट्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पदाबाबत आणि अन्य निर्णयांबाबत केंद्रीय नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय अंतिम असेल. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहोत.भाजपसोबत असलेल्या महायुतीला प्रचंड यश मिळाले. महाविकास आघाडीने थांबवलेले अनेक प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांसाठीही आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमुळे महायुतीला प्रतिसाद मिळाला असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा – एकनाथ शिंदे
महायुतीत समन्वयाने काम सुरू असून, उपमुख्यमंत्रीपदाबाबतही चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाविषयीच्या चर्चांबाबत विचारले असता, शिंदे यांनी हे नाकारले नाही. अशा चर्चा या होत असतात. सध्या या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही,” असे सांगून त्यांनी अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. महायुतीत समन्वय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सुरु चर्चांना विराम दिला. मला काय मिळाले हे महत्वाचे नसून जनतेला काय मिळाले हे महत्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.





