Satara: भाजपमध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतेही पद नाही

सातारा : भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करण्याचे काम सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिले आहे. आजपर्यंत जवळपास एक कोटी पस्तीस लाखापर्यंत भाजपचे प्राथमिक सदस्य झाले आहेत. लवकरच उद्दिष्ट पूर्ण होईल याची सर्वांना खात्री आहे. मात्र, भाजपमध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कार्यकर्त्यांना कोणतेही पद दिले जाणार नाही, असे सातारा जिल्हा प्रभारी महेश जाधव यांनी सांगितले.
भाजपच्या सक्रिय सदस्यसाठीच्या अभियानाची जिल्ह्याची बैठक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे सक्रिय सदस्य अभियान प्रभारी महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सक्रिय सदस्यता अभियान सातारा जिल्हा संयोजक आणि जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सातारा जिल्हा सहसंयोजक आणि सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सागर शिवदास, मनीषा पांडे, सुनील शिंदे, संतोष कणसे, रोहिदास पिसाळ, विकल्प शहा, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, संतोष जाधव, गणेश यादव, नंदकुमार सुर्वे, धनंजय चव्हाण, शंकर शेजवळ, गणेश सत्रे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे , माजी उपनगराध्यक्ष अमोल कदम, फिरोज पठाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, प्रदेश कार्यालयातून पंच्याहत्तर जणांची एक समिती तयार केली असून, प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये एका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली आहे, या पदाधिकाऱ्यांनी पाच दिवस त्या जिल्ह्यामध्ये मुक्काम करून त्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा, सर्व मंडले यांचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सदस्यता वाढीसाठी प्रयत्न करायचा आहे. सातारा जिल्ह्यासाठी या अभियानाचे जिल्हा प्रभारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नेहमी सर्व कामांमध्ये अग्रेसर असतात, सक्रिय सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण करतील, अशी खात्री महेश जाधव यांनी व्यक्त केली.
सक्रिय सदस्य होण्यासाठीचा फॉर्म जमा करा
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतीही शासकीय जिल्हा, तालुका कमिटी, विशेष कार्यकारी अधिकारी, महामंडळे यावर नियुक्तीसाठी शिफारस केली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी सुद्धा भाजपचा सक्रिय सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपल्या रेफरल कोडवर पन्नास सदस्य पूर्ण करून सक्रिय सदस्य होण्यासाठीचा फॉर्म जमा करावा, असे आवाहन सुद्धा सक्रिय सदस्यता अभियान सातारा जिल्हा प्रभारी महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले
जिल्ह्यात साडेनऊ हजार सक्रिय सदस्य करण्याचे उद्दिष्ट
सातारा जिल्ह्याने प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या प्राथमिक सदस्य नोंदणी उद्दिष्टापैकी सत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी लवकरच सर्व उद्दिष्ट पूर्ण करतील. सातारा जिल्ह्यामध्ये साडेनऊ हजार सक्रिय सदस्य करण्याचे उद्दिष्ट घेतले असून आज अखेर एक हजार सातशे सक्रिय सदस्यांचे फॉर्म जिल्हा कार्यालयामध्ये जमा झाले आहेत, ते उद्दिष्ट सुद्धा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.





