Satara | एनकूळच्या सिद्धनाथाची यात्रा गट-तट विसरून उत्साहात साजरी

मायणी (प्रतिनिधी) – अनेक वर्षे गटा-तटाच्या राजकारणात अडकलेली एनकूळ, ता. खटाव येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथाची यात्रा गावातील युवक व पोलीस प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने गट तट विसरून एकत्रितपणे विविध कार्यक्रमाने साजरी झाल्यामुळे एनकूळमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
अनेक वर्षे एनकूळ मधील ग्रामदैवत सिद्ध श्री सिद्धनाथाची यात्रा दोन राजकीय गटांमध्ये साजरी होत असे. दोन्ही गटांकडून यात्रेसाठी वर्गणी गोळा करण्यात असे. त्याचा आर्थिक भार नागरिकांना सोसावा लागत असे. त्यातून कधी वादविवाद होत असत.
यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाने यात्रा एकत्र भरविण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले होते. मात्र, त्यास यश येत नव्हते.
यावेळी वडूजचे कार्य तत्पर पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांनी गावामध्ये बैठक घेऊन यात्रा एकत्रितपणे साजरी करण्याबाबत सर्वाशी चर्चा केली. त्यास गावातील युवक व राजकीय मंडळींनी देखील संमती दिल्याने यात्रा अत्यंत शांततेच्या व धार्मिक वातावरणात झाली.
हे गाव राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दत्तक घेऊन त्याची आदर्श ग्रामसाठी निवड केली होती. त्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली होती.
मात्र, यात्रा एकत्रितपणे भरत नव्हती याची खंत नागरिकांना वाटत होती. त्यासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यावर्षी यश आले.
अशीच एकत्रितपणे यात्रा व्हावी
या निमित्ताने मेडद, निकमवाडी, काळेवाडी, कणसेवाडी, काकडेवाडी येथील गजी मंडळांचा कार्यक्रम झाला. बगाडाची मिरवणूक देखील ढोल, ताशा, सनई हलगी यांच्या साथीत व गुलालाची उधळण करत झाली.
नागरिकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. श्रीनाथ मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
परिसरातील विविध गावच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी श्रीनाथ मंदिरात गर्दी केली होती. ही यात्रा यापुढेही एकत्रितपणे अखंडितपणे अशाच पद्धतीने चालू राहावी अशाच प्रकारच्या अपेक्षा ही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.





