सातारा | कोरेगाव बाजार समितीचे काम गौरवास्पद

कोरेगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीला नवी दिशा देण्याचे काम सभापती ॲड.पांडुरंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ व अधिकारी- कर्मचारी करत आहेत. शेतकरी हितासाठी बाजार समिती कायम काम करत असून तिचा राज्य पातळीवर गौरव होतो आहे, ही निश्चित अभिमानास्पद बाब आहे. जनावरांचा बाजार पुन्हा नव्याने जोमाने सुरू करून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात करोना काळ तसेच लंपी या आजाराच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला व काही अंशी विस्कळीत झालेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते वाढवून झाले. त्याप्रसंगी आ. शिंदे बोलत होते. सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रीती काळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीमंत दादा झांजुर्णे, सभापती ॲड. पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, माजी सभापती अजयबापू कदम, जयवंत घोरपडे, सचिव संताजी यादव आणि संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले, जनावरांच्या बाजाराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी कोरेगाव या तालुक्याच्या मुख्यालयात सुविधा उपलब्ध झाली आहे. बाजार समितीच्या नियंत्रणाखाली योग्य व अचूक व्यवहार होणार असून शेतकऱ्यांची कोणतेही प्रकारची फसवणूक होणार नाही, त्याचबरोबर बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होणार आहे. बाजार समितीने उत्पन्न वाढीचे नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आ. शिंदे यांनी दिली.
खा. शरद पवार यांनी संपूर्ण देशातील विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला कायमच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत माथाडी कामगाराचा पोरगा म्हणून शेतकरी बांधवांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न मी स्वतःहून करत आहे. आज या भव्य दिव्य अशा बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होईल. या पुढील काळात देखील शेतकरी वर्गाला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असा विश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
सचिव संताजी यादव यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी बाजार समितीच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर सरसकट आले खरेदी विक्रीबाबत कोरेगाव बाजार समितीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा जाहीरपणाने भूमिका घेतली. बाजार समितीच्या या उत्कृष्ट कार्याची राज्य सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दखल घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड येथे पणन मंत्री अब्दुल सत्तार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरेगाव बाजार समितीचा गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक श्रीमंतभाऊ झांजुर्णे, नानासाहेब भिलारे, अजित भोईटे, किशोर बर्गे, संजय पिसाळ, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.





