मोहित देवधर खंडाळा : दि. ६ रविवारी दि.६ रोजी खंडाळ्यात महामार्गावर रात्री साडेआठच्या सुमारास चारचाकी वाहनाने पेट घेतल्याने महामार्गावर बर्निंग कारचा थरार उडाला. या घटनेने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने झाल्याने वाहतुकीच्या रांगा लागल्या. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, महामार्गावर रात्री साडेआठच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सेंट्रो चारचाकी वाहनाने (क्र-एमएच.१४-बी आर.९९६२) पारगाव – खंडाळा या ठिकाणी अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही परंतु बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. महामार्गावर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले, परिणामी वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दत्ताजी दिघे, दिग्विजय पोळ, प्रकाश फरांदे व शिरवळ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. यावेळी एशियन पेंट्स अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले.