सातारा – मातीचा सुगंध शेतीकडे, जन्मभूमीकडे खेचून आणतो

सातारा – मातीचा सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या गावातील यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून, त्यांनी बुधवारी बराच वेळ आपल्या शेतात व्यतित केला. त्यांच्या शेतात औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, शेतीत रमल्याने एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना, पण अन्य सर्व गोष्टी बाजूला राहतात. आपला गाव, शेती, गावाकडची माणसे यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला, तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल, आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम आणि ओढ असते.
आर्थिक उत्पन्न वाढवणार्या पिकांचे उत्पादन शेतकर्यांनी घ्यावे. बांबू लागवड मोहीम सातारा जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर राबवण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबूबरोबरच रेशीम, सुपारी लागवड शेतकर्यांनी एकत्र येऊन करावी. त्यातून शेतकर्यांची आर्थिक निश्चित उन्नती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कादांटी खोर्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्गसंपन्न आहे. या खोर्यात वासोटा किल्ला, उत्तरेश्वर मंदिर यांसारखी विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





