Satara: उन्हाळ्यात वाढतोय त्वचेच्या कर्करोगाचा धोका

सातारा : कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, ज्याचे वेळीच निदान झाले नाही तर तो प्राणघातक ठरू शकतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच त्वचेचा कर्करोग. तापमानात वाढ झाल्याने स्किन कॅन्सरचा धोका वाढत आहे. या कॅन्सरला मेलेनोमा कॅन्सर असंही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या अशा भागांमध्ये जास्त होतो ज्यावर कडक ऊन पडतं. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो, अशी माहिती साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॅाजिस्ट डॉ. अमोल पवार यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, त्वचेच्या कर्करोगाच्या मुख्य प्रकारामध्ये बेसलसेल कार्सिलोमा, स्वॅमससेल कार्सिलोमा, मेलिनोमा यांचा समावेश होतो. याशिवाय काही दुर्मिळ कर्करोगदेखील असतात. जर तुमच्या त्वचेवर, विशेषतः तुमच्या चेहऱ्यावर, हातावर किंवा मानेवर, खडबडीत, कोरडी, सोललेली त्वचा तयार झाली असेल, तर तो केवळ कोरडेपणा नसून ते त्वचेच्या कर्करोगाचे लक्षणही असू शकते. उन्हाळ्यात त्वचेचा रंग थोडा बदलणे सामान्य आहे, परंतु जर एखाद्या विशिष्ट भागाच्या त्वचेचा रंग काळा, लाल किंवा निळा झाला आणि तिथे थोडीशी सूजही आली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु ते मेलेनोमाचे लक्षण असू शकते. हा त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात गंभीर प्रकार आहे.
त्वचेवर नवीन गाठी तयार होणे
काही जण उन्हात राहिल्यानंतर त्यांच्या त्वचेवर लहान गाठी किंवा मुरुमं दिसू लागतात. जर या गाठी वेदनारहित असतील, हळूहळू वाढत असतील आणि त्यांचा रंग बदलत असेल, तर त्यांना हलक्यात घेऊ नका.बेसल सेल कार्सिनोमा किंवा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आजारांची ही लक्षणे असू शकतात.
बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा यांसारख्या कर्करोगांमुळे जळजळ आणि वेदना सोबत नेहमीच खाज सुटू शकते . विशेषत: त्वचेवर कुठेतरी पुरळ किंवा जखमा असल्यास ही लक्षणे अधिक गंभीर असतात. मर्केल सेल कार्सिनोमा कर्करोगात लाल रंगाचे मस्से वाढू लागतात. जे उंचावले जातात परंतु कोणतीही विशेष समस्या निर्माण करत नाहीत. हे त्वचेच्या त्या भागात होण्याची शक्यता असते ज्यांना थेट सूर्यप्रकाश मिळतो.
उन्हाळ्यात त्वचेचा कर्करोग कसा टाळाल?
सनस्क्रीनचा वापर करा: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी किमान 30, 20 मिनिटे आधी कमीत कमी 30 एसपीएफ असलेले सनस्क्रिन वापरा.
उन्हात जाणे टाळा: सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान बाहेर पडणे टाळा. *
पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला: हलके, सुती आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. भरपूर पाणी प्या : शरीराला आतून हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी भरपुर पाणी प्या तसचे आपल्या रोजच्या आहारात फळांचा रस, भाज्यांचे सुप यांचा समावेश करा.





