सातारा : मराठा समाजाने मोठे केलेल्यांनीच त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोप; टीका करणार्या नेत्यांनाही दिला सल्ला
कोयनानगर – मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठे केले. परंतु, त्यांनीच मराठा समाज वंचित ठेवला. आज मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आल्यानंतर अशा प्रकारची तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करु नयेत, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणार्या नेत्यांना दिला आहे. तसेच ज्यांना मराठा समाजाने मोठे केले. त्यांनीच मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला.
दौलतनगर, ता. पाटण येथे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांच्या शाही विवाह सोहळ्याला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीकांत शिंदे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाला गेले अनेक वर्षे वंचित राहावे लागले. परंतु, आमच्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेमुळे कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही. सर्व समाजबांधव आमचेच आहेत. त्यामुळे एकाचं काढून दुसर्याला देण्याचं काम आमचे सरकार करणार नाही. ज्यांनी हयातभर मराठा समाजाला आरक्षणापासून वंचीत ठेवले. तेच आज आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली म्हणत असून सर्व्हेक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारची वक्तव्ये करुन ते तेढ निर्माण करत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई व राजे-निंबाळकर कुटुंबातील डॉ. वैष्णवी यांचा शुभविवाह रविवारी दौलतनगर येथे शाही पद्धतीने पार पडला. या शाही विवाहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अर्धे मंत्रीमंडळ व अनेक दिग्गज नेते, उद्योगपती उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, खा. श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शहाजीबापू पाटील, खा. श्रीकांत शिंदे, आ. अनिल बाबर, राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील, मदन भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदेयांच्यासह अनेक मान्यवर नेत्याची उपस्थिती होती.





