सातारा – आशा व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सातारा – आशा व गटप्रवर्तकांचा संप सुरूच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे येथे शिष्टमंडळांने भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजन करण्यासंदर्भात प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांची दरे या गावी संघटनेचे शिष्टमंडळ कॉ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली भेटले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आशांना 7 हजार रुपये व गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये भरीव मानधन वाढ व गटप्रवर्तकांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत मान्यता दर्शवली. तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी तयार करून मांडावा व त्याला मंत्रिमंडळ मंजूरी देईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या निर्णयाचे शिष्टमंडळाने स्वागत केले. मात्र मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर होईपर्यंत संपू सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. संघटना संपूर्ण लढा यशस्वी होईपर्यंत लढत राहणार असल्याचे आनंदी अवघडे यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत आशांना 7 हजार रुपये व गटप्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये वाढ करण्यात आली. प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचे फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. परंतू गटप्रवर्तक या आशांच्या वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्या अपुरी झालेल्या मानधन वाढीवर संघटनेने हस्तक्षेप घेत 10 हजार रुपये गटप्रवर्तकांची मानधन वाढ होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.





